नितीशकुमार यांचा हल्ला

सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) दिलेला पाठिंबा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपशी केलेली आघाडी यावरून जाहीर टीका करणारे संयुक्त जनता दलाचे नेते आणि सरचिटणीस पवनकुमार वर्मा यांच्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरुवारी जोरदार हल्ला चढविला. राजनैतिक अधिकारी ते राजकीय नेते असा प्रवास करणारे ‘विद्वान’ पवनकुमार हे आपला मार्ग निवडण्यास मोकळे आहेत, असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे.

पवनकुमार यांनी नितीशकुमार यांच्याशी याबाबत खासगीत चर्चा केली होती त्याबाबतचा तपशील असलेले दोन पानी पत्र पवनकुमार यांनी नितीशकुमार यांना पाठविले होते. मात्र तेच पत्र पवनकुमार यांनी अधिकृत ट्विटरवर आणि फेसबुकवर टाकले होते त्यानंतर दोन दिवसांनी नितीशकुमार यांनी पवनकुमार यांच्यावर हल्ला चढविला.

वर्मा यांनी या प्रश्नावरून नितीशकुमार यांच्याकडे वैचारिक स्पष्टतेची मागणी केली, पवनकुमार पाटणा येथे आले असूनही त्यांनी नितीशकुमार यांची भेट घेतली नाही. मात्र सीएए, एनपीआर आणि एनआरसी याबाबत नितीशकुमार यांनी पूर्ण निवेदन करावे, अशी मागणी वर्मा यांनी केली. नितीशकुमार एका कार्यक्रमासाठी येथील ऐतिहासिक गांधी मैदान येथे आले असता वार्ताहरांनी त्यांना गाठले आणि याबाबत प्रतिक्रिया विचारली. वर्मा यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे, परंतु त्यांनी ज्या पद्धतीची विधाने केली आहेत त्याने आपण निरुत्तर झालो आहोत, असे नितीशकुमार म्हणाले.

संयुक्त जनता दलाने घेतलेल्या भूमिकेबाबत संभ्रम असणे योग्य नाही, वर्मा यांचे म्हणणे त्यांनी पक्षाच्या मंचावर मांडावयास हवे होते, वर्मा यांनी काही गोष्टी आपल्याला खासगीत सांगितल्या त्याची आपण कधी जाहीर वाच्यता केली का, असा सवालही नितीशकुमार यांनी केला. त्यामुळे वर्मा हे आपला मार्ग निवडण्यास मोकळे आहेत, असेही बिहारचे मुख्यमंत्री म्हणाले.

नितीशकुमार यांच्या उत्तरावर पुढील निर्णय अवलंबून – वर्मा

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आपण पत्र पाठविले असून त्यांच्याकडून त्याबाबत येणाऱ्या उत्तरावर आपला पुढील निर्णय अवलंबून असेल, असे संयुक्त जनता दलाचे सरचिटणीस पवनकुमार वर्मा यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले. देशासाठी आणि पक्षासाठी जे चांगले आहे त्याबाबत आपण बोलतच राहणार असल्याचेही ते म्हणाले. वर्मा आपला मार्ग निवडण्यास मोकळे आहेत, असा हल्ला नितीशकुमार यांनी चढविल्यानंतर वर्मा यांनी वरील भाष्य केले आहे. नितीशकुमार यांच्याकडून आपल्याला अद्याप उत्तर मिळालेले नाही, त्यांच्याकडून येणारे अथवा न येणारे उत्तर यावर आपला पुढील निर्णय अवलंबून आहे, योग्य वाटेल ते आपण बोलतच राहणार, असेही राज्यसभेचे माजी खासदार असलेले वर्मा यांनी म्हटले आहे.