वरिष्ठ मुत्सद्दी पवन कपूर यांची सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या इस्रायलमध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते जयदीप सरकार यांची जागा घेतली.

भारतीय परराष्ट्र सेवेचे (आयएफएस) १९९०च्या तुकडीचे अधिकारी असलेले कपूर हे सध्या मोझांबिकची राजधानी मापुटो येथे भारताचे उच्चायुक्त आहेत. ते लवकर पदाची सूत्रे स्वीकारण्याची अपेक्षा आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे यावर्षी भारताच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता असल्यामुळे कपूर यांच्या नियुक्तीला महत्त्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही तेल अवीवला परतीची भेट देऊ शकतात.

इस्रायलसोबत भारताचे संबंध अधिक दृढ होत आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तेल अवीवला भेट दिली होती. या ज्यू राष्ट्राला भेट देणारे भारताचे ते पहिले प्रमुख ठरले होते.

भारत हा इस्रायलकडून लष्करी सामग्री घेणारा सर्वात मोठा खरेदीदार आहे. गेल्या काही वर्षांत इस्रायलने भारताला अनेक शस्त्रयंत्रणा, क्षेपणास्त्रे आणि टेहळणी करणारी वैमानिकरहित विमाने (यूएव्ही) पुरवली आहेत.