पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मालेरकोटला पंजाबचा २३ वा जिल्हा घोषित केल्याने, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत त्यावर टीकात्मक टिप्पणी केली होती. यामुळे आता मुख्यमंत्री अमरिंदर सिंग भडकले असून, त्यांनी मुख्यमंत्री योगींना प्रत्युत्तर दिलं आहे. योगींनी पंजाबमधील प्रकरणांपासून दूर राहीलं पाहिजे. भाजपाच्या विभाजनकारी व विनाशकारी सरकारच्या तुलनेत पंजाबमध्ये बरीच चांगली परिस्थिती आहे. असं मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.

मालेरकोटला हा जिल्हा घोषित करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत, मतं आणि धर्माच्या आधारावर कोणत्याही प्रकारचा भेद करणं हे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत भावनेच्या विरोधात आहे. आता, मलेरकोटला(पंजाब)ची निर्मिती ही काँग्रेसच्या विभाजनकारी धोरणाचं प्रतिबिंबच आहे. अशी टिप्पणी केली होती.

तर, कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, उत्तर प्रदेशात मागील चार वर्षांत भाजपा सरकारने केवळ जातीय वादच पुढे आणले आहेत. पंजाबच्या सिद्धांत किंवा मालेरकोटलाच्या इतिहासाबद्दल योगींना माहिती आहे का? मालेरकोटलाचा शीख धर्म आणि गुरू साहिबांसोबतच्या नात्याबाबत प्रत्येक पंजाबीला माहिती आहे. त्यांना (योगी) भारतीय राज्यघटना काय समजणार, जिचे उत्तर प्रदेशात त्यांच्याच सरकारद्वारे रोज उल्लंघन केले जात आहे.

योगी सरकार भाजापचा सामाजिक द्वेष पसरवण्याचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता, अशा प्रकराची टिप्पणी विचित्र व निराधार आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगींच्या विभाजनकारी धोरणाबद्दल सर्व जगाला माहिती आहे. उत्तर प्रदेशात मुगल सरायचं नाव पंडित दीनदयाल उपाध्याय नगर, इलाहाबादचं नाव प्रयागराज आणि फैजाबादचं नाव अयोध्या करण्यात आल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी योगी सरकारकडून इतिहास पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं आहे.