कठुआतील आठ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणावरुन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तिना लगार्ड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कान टोचले आहेत. कठुआतील घटना बीभत्स असून पंतप्रधान मोदींनी या घटनेची गंभीर दखल घेऊन महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, असे लगार्द यांनी म्हटले आहे.

कठुआ आणि उन्नावमधील बलात्कार प्रकरणानंतर देशभरात असंतोष व्यक्त होत असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनांची दखल घेतली जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या क्रिस्तिना लगार्ड यांनी देखील गुरुवारी कठुआ बलात्कार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, भारतात (कठुआ प्रकरणाला उद्देशून) जे घडलं ते खरंच बीभत्स होतं. मला आशा आहे की भारतातील प्रशासन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व घटनांकडे गांभीर्याने बघतील. भारतातील महिलांना सुरक्षेची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. मी डाव्होसमध्ये मोदींना भेटले होते. तिथे देखील मोदींच्या भाषणात भारतीय महिलांचा फारसा उल्लेख नव्हता. यावरुन मी त्यांच्याकडे नाराजी देखील व्यक्त केली होती, असे त्यांनी नमूद केले. हे माझे वैयक्तिक मत आहे. हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मत नाही, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले आहे.