वादग्रस्त विधान करणारी अभिनेत्री पायल रोहतगी एका व्हिडीओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष मोतीलाल नेहरू यांच्याविषयीचा एक व्हिडीओ पायलनं तयार केला होता. याप्रकरणात राजस्थान पोलिसांनी तिला अटक केली आहे. याची माहिती स्वतः पायलनं ट्विटरवरून दिली आहे.

अभिनेत्री पायल रोहतगीने मोतीलाल नेहरू यांच्याविषयी एक वादग्रस्त व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पायल रोहतगी विरूद्ध तक्रार दाखल दिली होती. त्यानंतर आयटी कायद्यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर राजस्थान पोलिसांनी रविवारी गुजरातमधील अहमदाबाद येथून तिला ताब्यात घेतले. पोलिसांनी अटक केल्यानंतर पायल रोहतगीने स्वतःच्या ट्विटरवरून अटक झाल्याची माहिती दिली. “राजस्थान पोलिसांनी मोतीलाल नेहरू यांच्यावर व्हिडीओ बनल्याच्या प्रकरणात अटक केली आहे. हा व्हिडीओ मी गुगलवरून मिळालेल्या माहितीनुसार बनवला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मस्करी झाली आहे,” असं रोहतगीनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे हे ट्विट गृहमंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाला टॅग केलेलं आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पायल रोहतगीनं बुंदी येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार होती. मात्र, ती सुनावणी झाली नाही. आता या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.