रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या पेटीएमच्या ‘पेमेंट बॅंके’च्या शुभारंभाला मुहूर्त सापडला आहे. येत्या २३ मेपासून ही पेमेंट बॅंक अस्तित्त्वात येणार असून, त्यामाध्यमातून ग्राहकांना आपले व्यवहार करता येऊ शकणार आहेत. पेटीएमकडून काढण्यात आलेल्या एका निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

भारतात पेटीएम वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या देशामध्ये सुमारे २१.८ कोटी ग्राहक रोकडविरहित व्यवहारांसाठी पेटीएमचा वापर करतात. या सर्वांची पेटीएमवरील खाती २३ मेपासून पेटीएम पेमेंट बॅंक लिमिटेडमध्ये वर्गीकृत होतील. त्यामुळे याच तारखेपासून पेटीएम अॅपचे रुपांतर पेटीएम पेमेंट बॅंकमध्ये होईल. ज्या ग्राहकांना या बॅंकेच्या व्यवहारामध्ये सहभाग घ्यायचा नसेल, त्यांच्या पेटीएमवरील शिल्लक रक्कम त्यांनी अॅपमध्ये नोंदणी केलेल्या बॅंकेमध्ये हस्तांतरित करण्यात येईल. यासाठी ग्राहकांना २३ मे पूर्वी पेटीएमला सूचित करणे आवश्यक करण्यात आले आहे. जे ग्राहक याबद्दल माहिती देतील. त्यांच्याच पेटीएम खात्यावरील रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात हस्तांतरित करण्यात येईल. ही माहिती न दिल्यास त्यांच्या पेटीएम अॅप खात्याचे रुपांतर पेटीएम पेमेंट बॅंकेच्या खात्यामध्ये होईल.

जर तुम्ही सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ पेटीएम वापरत नसाल, तर तुम्ही लेखी मंजुरी दिल्यानंतरच तुमच्या खात्यावरील शिल्लक रक्कम तुमच्या बॅंक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येईल. यापूर्वी गेल्यावर्षी दिवाळीमध्येच पेटीएमकडून पेमेंट बॅंक सुरू करण्याची तयारी करण्यात आली होती. पण आवश्यक मंजुऱ्यांअभावी या प्रक्रियेला विलंब झाला होता. रिझर्व्ह बॅंकेने २०१५ मध्येच ‘वन९७ कम्युनिकेशन्स’चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना पेमेंट बॅंक सुरू करण्यासाठी तत्वतः मंजुरी दिली होती.

पेमेंट बॅंक म्हणजे काय?
पेमेंट बॅंक ही रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची संकल्पना आहे. या बॅंकांमध्ये ग्राहकांना एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम ठेवता येऊ शकते. सरकार सध्या रोकड विरहीत व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. त्यालाच अनुसरुन पेमेंट बॅंकेद्वारे एक लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार हे रोकडविरहीत करता येऊ शकतील.