पीडीपी आणि भाजपा हे वाढत्या गुन्हेगारीतले भागीदार आहेत. काश्मीरी नागरिकांना याची किंमत आपले रक्त सांडून मोजावी लागणार आहे अशी टीका जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचे बंधू तसादुक मुफ्ती यांनी केली आहे. पिपल्स डेमॉक्रॉटिक पार्टी आणि भाजपा यांनी एकत्र येत जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले. तेव्हापासून राज्यातली गुन्हेगारी वाढली आहे. या वाढत्या गुन्हेगारीतही पीडीपी आणि भाजपा हे दोन पक्ष भागीदार आहेत. त्यांच्या या भागीदाराची किंमत काश्मीरच्या नागरिकांना आपले रक्ताने मोजावी लागते आहे.

तसादुक मुफ्ती हे मुफ्ती सरकारमध्ये पर्यटन मंत्री आहेत. त्यांनी पक्षाचे प्रवक्ते म्हणून ही भूमिका मांडली नाहीये पण आपल्याला जे वाटते आहे ते आपण व्यक्त केले आहे असे इंडियन एक्स्प्रेसला त्यांनी सांगितले. की हा माझा व्यक्तीगत दृष्टीकोन नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपासोबत युती केल्यानंतर आम्ही एकप्रकारच्या तणावाखाली आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.

कठुआमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. तसेच गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या विविध घटनांमध्ये १८ नागरिक मारले गेले आहेत. तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानी सैनिक, दहशतवादी आणि भारतीय सेना यांच्यात चकमक होत असते त्याचाही फटका सामान्य नागरिकांना बसतो असेही तसादुक मुफ्ती यांनी म्हटले आहे. देशभरात कठुआ आणि उन्नाव या दो ठिकाणी झालेल्या बलात्काराविरोधात निषेधाचे पडसाद उमटत आहेत. अशातच तसादुक मुफ्ती यांनी आपल्या सरकारला घरचा आहेर देत भाजपावरही निशाणा साधला आहे.