जम्मू-काश्मीर विधानसभेतील त्रिशंकू स्थितीचा लाभ भारतीय जनता पक्षाला होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करण्याचे अप्रत्यक्षपणे संकेत दिल्याने दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राम माधव यांनी यासंबंधी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासमवेत चर्चा केली. राम माधव यांनी पीडीपीच्या सर्वोच्च नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्या भूमिकेवर समाधान व्यक्त केले आहे. मात्र सत्तास्थापनेसाठी कुणी पुढाकार घ्यायचा यावर उभय पक्षांमध्ये चर्चा सुरू झालेली नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये ८७ जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला २५ तर पीडीपीला २८ जागा मिळाल्या. मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेसच्या मदतीने सत्तास्थापनेसाठी पीडीपीने चाचपणी केली. परंतु राज्यात नॅशनल कॉन्फरन्स हाच प्रमुख विरोधक असल्याने पीडीपीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनीच सत्तास्थापनेस विरोध केला. त्यामुळे पीडीपीने आता भाजपसमवेत युतीसाठी चाचपणी सुरू केली आहे. मात्र कलम ३७० व समान नागरी कायद्याविषयी असलेली भूमिका भाजपने बदलावी, असा आग्रह पीडीपीने सुरू केला आहे.  राष्ट्रीय पक्ष असल्याने जम्मू-काश्मीरमध्ये सत्तास्थापनेसाठी आम्ही उतावीळ नाही, अशा शब्दात भाजप नेत्यांनी पीडीपीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. भाजप विरोधी बाकांवर बसल्यास सत्तासंचालन करता येणार नाही व भाजपला सोबत घेतल्यास मुख्यमंत्रीपद द्यावे लागेल, अशा दुहेरी कोंडीत पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती आहेत.
या संदर्भात राम माधव म्हणाले की, मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपीकडून युतीसाठी अद्याप प्रस्ताव आलेला नाही. भाजपनेही असा प्रस्ताव दिलेला नाही. मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू- काश्मीरच्या राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले होते की, जनमताचा आदर राखूनच सत्ता स्थापन केली जाईल.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यात मिळालेला प्रतिसाद भाजपसाठी सुवर्णसंधी आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा वारसा त्यांना पुढे चालवावा लागेल. वाजपेयी यांनी केवळ हुरियत नव्हे तर पाकिस्तानसमवेतही संवाद साधल्याची आठवण मेहबूबा मुफ्ती यांनी नरेंद्र मोदी यांना करून दिली होती. जोपर्यंत शांतता निर्माण होत नाही तोपर्यंत विकास होणार नाही, असे सूचक विधान त्यांनी केले होते. मेहबूबा मुफ्ती यांच्या वक्तव्यांवर बोलण्यास राम माधव यांनी नकार दिला.