श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पंचायत व पालिका निवडणुकांवर पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाने बहिष्कार टाकला आहे. नॅशनल कॉन्फरन्सने आधीच या निवडणुकांवर बहिष्कार टाकल्यानंतर आता पीडीपी हा बहिष्कार टाकणारा दुसरा प्रादेशिक पक्ष ठरला आहे. पक्षाच्या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले, की सध्याची परिस्थिती योग्य नसल्याने आम्ही निवडणुका लढवणार नाही. कलम ३५ ए च्या संरक्षणासाठी आम्ही कुठलीही पातळी गाठू शकतो. राज्यातील लोकांनी बरेच काही गमावले आहे. आता कलम ३५ ए बरोबर कुणी खेळ करू शकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्षाचे प्रवक्ते रफी अहमद मीर यांनी सांगितले, की कलम ३५ ए रद्द करण्याबाबत व्यक्त होत असलेल्या शंकांचे निरसन होत नाही तोपर्यंत पालिका व पंचायत निवडणुका घेणे उचित नाही.

नॅशनल कॉन्फरन्सने पंचायत व पालिका निवडणुकांवर तसेच २०१९ मधील निवडणुकांवरही बहिष्कार टाकला आहे. केंद्र व राज्य सरकार कलम ३५ ए बाबत भूमिका स्पष्ट करून त्यांचे न्यायालयात व न्यायालयाबाहेर संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करत नाही तोपर्यंत आमचा निवडणुकांवर बहिष्कार राहील. कलम ३५ ए अन्वये काश्मीरमधील लोकांना विशेष अधिकार दिले असून बाहेरच्या व्यक्तींना राज्यात स्थावर मालमत्ता विकत घेता येत नाही. त्या कलमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून त्याबाबतच्या याचिकांची सुनावणी निवडणुकीनंतर घेण्यात येईल, असे न्यायालयाने जाहीर केले होते. गेल्या ३१ ऑगस्ट रोजी केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी सर्वोच्च न्यायालयात असा युक्तिवाद केला होता,की या कलमाची सुनावणी आता घेतल्यास राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे याचिकांची सुनावणी जानेवारी किंवा फेब्रुवारीत करण्यात यावी. न्यायालयाने ती विनंती मान्य केली होती.

भाजपशी आघाडीची शक्यता नाही – ओमर

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपसमवेत आघाडी करण्याची शक्यता नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी फेटाळली आहे. हे धादांत खोटे वृत्त असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा आणि संघटना अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. भाजपसमवेत आघाडीसाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सरकारला नॅशनल कॉन्फरन्स पाठिंबा देणार असल्याचे सूचित करणाऱ्या जुन्या (२०१४ मधील) व्हिडीओ फिती व्हायरल केल्या जात आहेत, मात्र तसे होणार नाही, असे त्यांनी ट्वीट केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pdp boycott on municipal and panchayat elections in kashmir
First published on: 11-09-2018 at 01:15 IST