जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पीडीपीचे आमदार मोहम्मद अश्रफ मिर हे स्वयंचलित रायफलमधून हवेत फैरी झाडत असल्याची व्हिडीओ फीत प्रसारित करण्यात आल्याने काश्मीरमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, मिर यांनी या आरोपाचे जोरदार खंडन केले असून हा विरोधकांचा डाव असल्याचे म्हटले आहे.
व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांवरून ही फीत प्रसारित करण्यात आली असून त्यामध्ये मिर हे आपल्या निवासस्थानातून एके-४७ रायफलीतून अनेक फैरी हवेत झाडत असल्याचे दिसत आहे. मिर यांनी सोनावर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा पराभव केला आहे. निवडणुकीत आपला विजय झाल्यानंतर खळबळ माजली होती. आपण एकही फैर झाडली नाही, आपल्या खासगी सुरक्षा रक्षकाची रायफल जमिनीवर पडली होती ती उचलून आपण त्याच्याकडे सुपूर्द केली, असे मिर यांनी म्हटले आहे.
मिर यांनी ओमर अब्दुल्ला यांचा सोनावर मतदारसंघातून ४७०० हून अधिक मतांनी पराभव केला. विद्यमान मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारे मिर हे पहिलेच राजकीय नेते आहेत. याचा आनंद साजरा करताना त्यांनी ही आगळीक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.