राखण्यासाठी नवे धोरण आखण्याचा निर्णय

जम्मू- काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना संपुष्टात आणण्यासाठी नवे धोरण आखण्याचा निर्णय भारत व पाकिस्तानच्या महासंचालकस्तरीय सीमाविषयक बोलण्यांमध्ये गुरुवारी घेण्यात आला.

भारताचे सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी रेंजर्स यांच्यातील महासंचालक स्तराची बोलणी गुरुवारपासून सुरू झाली. नवा करार व धोरण यांचा मसुदा याबाबत चर्चा करून त्याला अंतिम रूप देण्यासाठी तीन दिवसांची नियोजित बैठक एक दिवसाने वाढवण्याची उत्साहवर्धक घडामोड दोन शेजारी देशांमधील द्विपक्षीय बोलण्यांमध्ये झाली आहे. सीमेवर शांतता व स्थैर्य कायम राहणे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असून त्याची प्रत्यक्ष जमिनीवर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याबाबत दोन्ही बाजूंमध्ये एकमत झाले, हे महत्त्वाचे फलित असल्याचे सूत्राने सांगितले.

बैठकीच्या ठरलेल्या विषयपत्रिकेनुसार ही बोलणी गुरुवारीच संपणार होती आणि शुक्रवारी रेंजर्स गृहमंत्री राजनाथ सिंह यांना भेटून नंतर पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना भेटणार होते.

मात्र या बोलण्यांची मुदत एका दिवसाने वाढवण्यात आली असून, भारत-पाक सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना संपुष्टात आणून तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या कराराचा मसुदा तयार करण्याचा निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी एक विशेष सत्र होईल, असे सूत्राने सांगितले.

भूतकाळातील घटनांबाबत वादविवाद करण्यापेक्षा दोन्ही बाजूंनी ही सीमा शांत, तसेच सैन्य व नागरिक यांच्यासाठी सुरक्षित बनवण्यासाठी ‘भविष्यकालीन धोरण’ आखावे अशी सूचना भारताने केल्याचे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानने या मुद्यावर सहमती दर्शवली व आणखी सकारात्मक बोलण्यांनंतर हे सत्र एका दिवसाने वाढवण्याचा े निर्णय घेण्यात आला.