अमेरिकी पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या २००२ सालच्या खळबळजनक अपहरण व हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि ब्रिटिश नागरिक असलेला अल-कायदाचा दहशतवादी ओमर सईद शेख याला दोषी सिद्ध करण्यात अभियोजन पक्ष अपयशी ठरल्याची टीका पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने केल्याचे एका माध्यमाच्या वृत्तात म्हटले आहे.

या प्रकरणी निकाल देणाऱ्या तीन सदस्यीय खंडपीठाचे सदस्य असलेले न्या. सरदार तारिक मसूद यांनी लिहिलेला ४३ पानांचा सविस्तर निकाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जारी केला. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेला पुरावा वास्तविक आणि कायद्याच्या दृष्टीने पूर्णपणे त्रुटीयुक्त असल्याचे न्यायाधीशांनी नमूद केल्याचे वृत्त ‘डॉन’ वृत्तपत्राने दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या २८ जानेवारीला दोन विरुद्ध एक अशा बहुमताने ओमर शेख व इतरांची सुटका केली होती, तसेच फहाद नसीम अहमद, सैयद सलमान साकिब व शेख मोहम्मद आदिल या प्रमुख संशयितांची तुरुंगातून तत्काळ सुटका करण्याचा आदेश दिला होता. त्याची कारणे स्पष्ट केली आहेत.