पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून हल्ला चढवताना, मोदी सरकार ‘पाळतशाही’ आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केला.

पेगॅसस स्पायवेअरचा वापर करून राजकीय नेते, कार्यकर्ते, पत्रकार आणि न्यायाधीशांनाही कथितरीत्या लक्ष्य करणाऱ्या या हेरगिरी घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी, असे ममता म्हणाल्या. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी विरोधी पक्षांना केले.

‘भाजप एका लोकशाही देशाचे रूपांतर कल्याणकारी राज्याऐवजी पाळतशाहीत करू इच्छिते’, असे कोलकात्यात शहीद दिवस मेळाव्याला दूरसंवादाद्वारे संबोधित करताना त्या म्हणाल्या. करांपोटी गोळा केलेला पैसा हेरगिरीसाठी वापरल्याचा आरोपही त्यांनी केला.