खशोगीच्या प्रेयसीवरही पाळत

बोस्टन : ग्लोबल मीडिया कन्सॉर्टियमने आतापर्यंत गोळा केलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या एनएसओ समूहाने पेगॅसस या स्पायवेअरच्या माध्यमातून पत्रकार व कार्यकर्ते यांना लक्ष्य केले आहे. यात मानवी हक्क कार्यकर्ते, राजकीय बंडखोर यांचा समावेश होता.

पन्नास हजार सेलफोन क्रमांक पॅरिसच्या फॉरबिडन स्टोरिज व अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलला मिळाले असून ते १६ वृत्तसंस्थांना देण्यात आले. यात पत्रकारांनी १ हजार सेलफोन क्रमांकांची ओळख पटवली असून ते पन्नास देशांतील आहेत. त्यांच्यावर एनएसओकडून पाळत ठेवली जात होती. त्यात १८९ पत्रकार, ६०० राजकीय नेते व सरकारी अधिकारी, तसेच ६५ उद्योग अधिकारी, ८५ मानवी हक्क कार्यकर्ते यांचा समावेश आहे. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांवरही  पाळत ठेवली जात होती, असे ‘दी वॉशिंग्टन पोस्ट’ या कर्न्‍सोटियम सदस्य देशाने म्हटले आहे. दी असोसिएटेड प्रेस, रॉयटर्स, सीएनएन, दी वॉल स्ट्रीट जर्नल, ल माँद व दी फायनान्शियल टाइम्स यांच्या पत्रकारांवर पेगॅसस या स्पायवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवल्याचे उघड झाले आहे.

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने म्हटले आहे, की फोरेन्सिक संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार दी वॉशिंग्टन पोस्टचा मारला गेलेला पत्रकार जमाल खशोगी याची प्रेयसी हातिस सेनगिझ हिच्या फोनमध्ये हे स्पायवेअर बसवण्यात आले आहे. इस्तंबूल येथील दूतावासात २०१८ मध्ये खशोगी यांचा खून करण्यात आल्यानंतर चारच दिवसात त्याच्या प्रेयसीच्या फोनमध्ये पेगॅसस स्पायवेअर बसवण्यात आले होते.

एनएसओ समूहाने एपी वृत्तसंस्थेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. फॉरबिडन स्टोरीजची बातमी खोटी व कपोलकल्पित असल्याचे एनएसओने म्हटले आहे. कंपनीने असा दावा केला आहे, की दहशतवादी व गुन्हेगार यांच्यावरच आम्ही पाळत ठेवतो. ग्राहकांची माहिती ठेवली जात नाही.

‘हेरगिरी नियमांचे उल्लंघन’

टीकाकारांनी एनएसओचे दावे खोटे असल्याचा आरोप केला असून एनएसओ थेट उच्च तंत्र हेरगिरी करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. पेगॅसस स्पायवेअरचा गैरवापर करण्यात आला असून खासगी हेरगिरी उद्योगातील नियमांचे यात उल्लंघन करण्यात आले आहे.