लखनौ : जमावाच्या हिंसाचारात पहलू खान हा मारला गेल्याच्या प्रकरणातील आरोपींची केवळ निष्काळजी तपासामुळे सुटका झाली असून त्यात राजस्थान सरकारचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे असा आरोप बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केला आहे.

अल्वर न्यायालयाने बुधवारी पहलू खान याला जमावाने ठार केल्याच्या प्रकरणात सर्व सहा आरोपींची सुटका केली होती. त्यावर मायावती यांनी ट्विट  संदेशात म्हटले आहे की, राजस्थानातील काँग्रेस सरकारने यात निष्काळजीपणा व कृतिशून्यता दाखवली त्यामुळे सर्व आरोपी कनिष्ठ न्यायालयात निर्दोष सुटले आहेत. ही दुर्दैवी बाब आहे. जर सरकारने पहलू खानच्या कुटुंबीयांना खरंच न्याय मिळवून देण्याचे ठरवले असते तर असे घडले नसते. आता कदाचित यात कधीच न्याय मिळणार नाही.

पहलू खान (वय ५५) हा त्याची दोन मुले व इतरांसमवेत गायी घेऊन जात असताना त्याला अडवण्यात आले व जमावाने त्याला मारहाण केली. नंतर जखमी अवस्थेत त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला होता.  ही घटना अल्वर जिल्ह्य़ात १ एप्रिल २०१७ रोजी घडली होती.