जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुमचा खिसा आणखी रिकामा होऊ शकतो. कारण केंद्र सरकार एक नवी योजना आखण्याच्या तयारीत आहे. यानुसार नवीन कार खरेदीवर 12 हजार रुपये ‘पोल्यूटर पे’ म्हणजे प्रदूषण शुल्क आकारण्यासाठी सरकार नियम बनवत आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, याबाबतचा ड्राफ्ट तयार झाला असून लवकरच या नव्या योजनेला अंतिम स्वरुप मिळेल. सरकार पेट्रोल-डिझेलच्या कार खरेदीवर 12 हजार रुपये ‘पोल्यूटर पे’ म्हणजेच प्रदूषण शुल्क आकारण्यासाठी नियम बनवत आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीकडे कल वाढावा या दृष्टीने हे पाऊल उचललं जाणार आहे. या पैशांचा वापर इलेक्ट्रिक वाहन निर्मीती आणि त्यांच्या बॅटरी उत्पादनासाठी केला जाईल.

इलेक्ट्रीक टू-व्हिलर, थ्री- व्हिलर आणि कार खरेदी करणाऱ्यांना 25 ते 50 हजार रुपये सूट देण्यात यावी अशी मागणी कार उत्पादकांनी नीती आयोगाकडे केली होती. त्यानुसार विविध मंत्रालयाच्या सचिवांसोबत झालेल्या बैठकीनंतर नीती आयोगाने 25 ते 50 हजार रुपये सूट देण्यात यावी अशी मागणी केली, त्यानंतर सरकारकडून प्रस्ताव बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. इलेक्ट्रिक वाहन विक्रीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या वर्षी ही सूट मिळू मिळेल. केंद्र सरकार इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीकडे नागरिकांचं प्राधान्य असावं यासाठी अनेक पावलं उचलत आहे. यामध्ये पेट्रोल-डिझेल कारवर सरचार्ज आकारण्याच्या नव्या योजनेचाही समावेश आहे. याशिवाय सरकार इ-व्हेइकलच्या स्पेअरपार्ट आणि बॅटरीवरील जीएसटी कमी करुन 12 टक्के करण्याचा विचार करतंय. तसंच या वाहनांची मोफत नोंदणी करण्याचाही सरकारची योजना आहे. याशिवाय देशभरात सर्व पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक चार्जिग स्टेशन उभरण्याचा विचार असून पहिल्या एक हजार पंपांना सबसिडी मिळेल.