इस्लामिक स्टेटचा मास्टरमाईंड आणि संघटनेचा महत्त्वपूर्ण नेता अबू मोहम्मद अल-अदानानी हवाई हल्ल्यात मारला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. सीरियाच्या उत्तरेकडील भागात अमेरिकेच्या लष्करी कारवाईत अबू महंमद अल-अदनानी ठार झाल्याचे पेंटागॉनकडून सांगण्यात आले.
अल-अदनानी हा आयसिसमधील एक प्रभावशाली नेता होता. इस्लामिक स्टेटचा प्रवक्ता आणि संघटनेतील दुसऱ्या क्रमांकाचा नेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते.
त्याच्याकडे परदेशात हल्ले घडवून आणण्यासाठी मनुष्यबळाची भरती करण्याची जबाबदारी होती. याशिवाय, युरोपमध्ये स्थानिक स्तरावर दहशतवादी सेल्सची निर्मिती आणि त्यांना हल्ल्यासाठी उद्युक्त करण्यातही त्याचा महत्त्वपूर्ण वाटा होता. अमेरिकी लष्कराने अलेप्पो प्रांतातील अल-बाब शहराजवळ केलेल्या कारवाईत अल-अदनानीला ठार करण्यात आले. अलेप्पोतील हल्ले परतावून लावण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. या कारवाईत अमेरिकी लष्करासह संयुक्त फौजांनीही भाग घेतला होता.
अमेरिकेच्या सैन्याने ३०ऑगस्टला केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये अदनानी ठार झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, रशियाच्या सैन्याने यापूर्वी ३१ ऑगस्टलाच अदनानी आमच्या सैन्याच्या हल्ल्यात ठार झाल्याचे म्हटले होते. अल-अदनानी हा ‘इसिस‘चा सर्वांत ज्येष्ठ नेता होता. तो ठार झाल्यामुळे इसिससाठी हा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. त्यामुळे अल-अदनानी याच्या मृत्यूचा बदला घेण्याची घोषणा इसिसने केली आहे.