करोना व्हायरसने संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडले आहे. या व्हायरसची लागण झाल्यानंतर प्रत्येकामध्ये त्याचे वेगवेगळे परिणाम दिसून आले आहेत. काहींची प्रकृती गंभीर झाली, काहींमध्ये सौम्य लक्षणे दिसली तर काहींना हा आजार होऊन गेल्याचे कळले देखील नाही.

या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात लाखो लोकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना करोनाची लागण होऊ नये, यासाठी आपण विशेष काळजी घेतो. यामध्ये तोंडाला मास्क बांधणे, सोशल डिस्टन्सिंगसारखे उपाय आहेत. पण आपण घराबाहेर पडताना जितकी काळजी घेतो, त्यापेक्षा किंबहुना जास्त काळजी घरी असताना घेण्याची आवश्यकता आहे.

घराबाहेर कमी पण घरातल्याच सदस्यांकडून करोनाची लागण होण्याची शक्यता जास्त असल्याचा निष्कर्ष दक्षिण कोरियातील साथरोगशास्त्रज्ञांनी काढला आहे.

दक्षिण कोरियात ही साथ सुरु झाल्यानंतर करोना पॉझिटिव्ह ठरलेले ५,७०६ रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेले ५९ हजार जण यांचा अभ्यास करुन हा स्टडी रिपोर्ट बनवण्यात आला आहे. सेंटर फॉर डिजीस कंट्रोल अँड प्रिव्हएशनमध्ये १६ जूलैला हा रिपोर्ट प्रकाशित झाला. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. या स्टडी रिपोर्टनुसार करोनाची लागण झालेल्या १०० रुग्णांपैकी फक्त दोघांना घराबाहेरील व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे करोना झाला होता.

वयोगटाचा विचार केल्यास दक्षिण कोरियात घरातच करोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त होते. किशोरवयीन युवक-युवती आणि ६० ते ७० वयोगटातील नागरिकांना प्रामुख्याने करोनाची लागण झाली. “हे दोन्ही वयोगट कुटुंबीयांच्या जास्त संपर्कात असावेत. त्यामुळे या वयोगटांना जास्त सुरक्षेची आवश्यकता आहे” असे जीआँग यांनी सांगितले. ते कोरियन सेंटर फॉर डिजीस कंट्रोल अँड प्रिव्हएशनचे संचालक आहेत.

नऊ वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण अत्यअल्प आहे असे डॉक्टर यंग जून म्हणाले. प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये करोनाची लागण होऊनही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे त्या वयोगटात इंडेक्स रुग्ण शोधून काढणे कठिण गेले.

“वेगवेगळया वयोगटांमुळे करोना व्हायरसच्या प्रसारामध्ये फार असा मोठा फरक पडत नाही. लहान मुलांकडून या व्हायरसचा प्रसार होण्याचे प्रमाण फार कमी असू शकते. पण आमच्याकडे उपलब्ध डाटा कमी असल्यामुळे तसा दावा करता येणार नाही” असे डॉक्टर यंग जून म्हणाले. २० जानेवारी ते २७ मार्च दरम्यान गोळा केलेल्या माहितीवरुन हा अभ्यास करण्यात आला. या काळात दक्षिण कोरियात करोना व्हायरसचा मोठया प्रमाणावर प्रसार झाला.