देशातील अभुतपूर्व चलन टंचाईच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून आणखी एका महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयानुसार आता देशभरातील दुकाने आणि मॉल्सच्या स्वाईप मशिन्समधूनही नागरिकांना पैसे काढता येणार आहेत. यासाठी दोन हजार रूपयांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. येत्या ३० डिसेंबरपर्यंत स्वाईप मशिन्समधून पैसे काढण्यावर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले. त्यामुळे आता इतके दिवस बँका आणि एटीएम केंद्राबाहेर असलेल्या गर्दीचा ओघ दुकाने आणि मॉल्सकडे वळण्याची शक्यता आहे. दरम्यान, दुकानधारक आणि मॉल्स या आदेशाला कशाप्रकारे प्रतिसाद देतात, हे पाहणेदेखील औत्स्युकाचे ठरेल. यापूर्वी सरकारने पेट्रोल पंपावरूनही पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

दरम्यान, आज, शनिवारी देशभरातील सर्व बँकांमध्ये नोटबदलाचे काम होणार नाही, असे भारतीय बँक संघटनेने (इंडियन बँक असोसिएशन) शुक्रवारी स्पष्ट केले. त्यामुळे नोटबदलासाठी नागरिकांना दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र, या निर्णयाला ज्येष्ठ नागरिक अपवाद असतील. संघटनेच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी सामान्यांना आता थेट सोमवारीच बँकेसमोर रांग लावावी लागणार आहे. याशिवाय, बँकांतून नोटा बदलून देण्याचा निर्णयच स्थगित करण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे. चलनबदल योजनेचा लाभ काळा पैसा पांढरा करण्यासाठी घेतला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सरकार नोटा बदलून देण्याचा निर्णयच रद्द करण्याच्या विचारात आहे. याऐवजी या नोटांचा भरणा खातेदाराला खात्यात करावा लागेल. प्रथम साडेचार हजार रुपयांपर्यंतच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी ५० दिवसांची मुदत सरकारने दिली होती. बाजारपेठेत पैसा फिरता राहावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. एकूण साठ टक्के चलनसाठा प्रवाहित झाला असल्याने साडेचारऐवजी दोन हजार रुपयेच बदलून देण्याचा नवा निर्बंध शुक्रवारी जारी झाला. आता नव्या नोटा पुरेशा प्रमाणात आल्यावर जुन्या नोटा बदलून देण्यासच स्थगिती लाभण्याची चिन्हे आहेत.