भारतीय बँकांचे तब्बस ९ हजार कोटी बुडवणाऱ्या विजय माल्ल्याबद्दल लोकांना नेमके काय वाटत, याचा प्रत्यय खुद्द विजय माल्ल्याला आला आहे. कोट्यवधींचे कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये ऐशोआरामात राहात असलेल्या विजय माल्ल्या भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पाहायला आला होता. माल्ल्याला पाहताच भारतीय प्रेक्षकांनी ‘चोर… चोर…’ म्हणण्यास सुरुवात केली.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील ओव्हल मैदानावरील सामना पाहण्यासाठी विजय माल्ल्या स्टेडियमवर आला. विजय माल्ल्या स्टेडियममध्ये येताच लोकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यानंतर काही लोक माल्ल्याच्या दिशेने गेले आणि त्यांनी ‘चोर… चोर…’ म्हणण्यास सुरुवात केली. अचानक झालेला हा प्रकार विजय माल्ल्याला अनपेक्षित होता. त्यामुळे प्रेक्षकांची घोषणाबाजी ऐकून भांबावलेल्या विजय माल्ल्याने गप्प राहणे पसंत केले. प्रेक्षकांकडे दुर्लक्ष करत माल्ल्याने थेट स्टेडियममध्ये प्रवेश केला.

याआधी बर्मिंगहॅममधील विजय माल्ल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये विजय माल्ल्यासोबत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर दिसत होते. बर्मिंगहॅममध्ये भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान हा फोटो काढण्यात आल्याची चर्चा होती. मात्र गावसकर आणि माल्ल्या यांनी या फोटोवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. विजय माल्ल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर आला होता.

विजय माल्ल्या भारतातून पळून गेला आहे. माल्ल्यावर स्टेट बँकेसह अन्य बँकेचे तब्बल ९ हजार कोटींचे कर्ज आले. देशातील यंत्रणा माल्ल्याला भारतात आणण्याचे प्रयत्न करत असताना विजय माल्ल्या इंग्लंडमध्ये आरामात भारताचे क्रिकेट सामने पाहतो आहे. विजय माल्ल्या सध्या इंग्लंडमध्ये आहे. माल्ल्याने मागील वर्षी भारतातून पळ काढला होता. माल्ल्याला परत आणण्याचे अनेक प्रयत्न सरकारकडून सुरु असूनही अद्याप या प्रयत्नांना कोणतेही यश मिळालेले नाही.