पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे लक्षात ठेवावे की त्यांना फक्त भाषणे देण्यासाठी जनतेने पंतप्रधानपदी निवडलेले नाही असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. हिरे व्यापारी नीरव मोदी भारतातून कोट्यवधी रुपये घेऊन पळाला. हे पैसे देशातील शेतकऱ्यांचे, मोलमजुरी करणाऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे होते. मात्र स्वतःला देशाचे चौकीदार म्हणवणाऱ्या नरेंद्र मोदींनी शांत राहणेच पसंत केले.

‘गब्बर सिंग टॅक्स’ अर्थात जीएसटीमुळे देशातले अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. लोकांचे नुकसान होते आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय शहाने तीन महिन्यात ५० हजार रुपयांचे ८० कोटी कोणत्या जादुच्या कांडीने केले ते तरी देशाला सांगा असेही त्यांनी म्हटले आहे.

पीएनबी बँकेत घोटाळा झाला, ओरिएन्टल बँकेत घोटाळा झाला इतरही काही बँकांना चुना लावण्यात आला तरीही पंतप्रधान मूग गिळून गप्प आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त धनाढ्यांना मदत करतात. भ्रष्टाचाराविरोधात लढाई लढण्याचे नारे देणाऱ्या मोदींनी लोकपाल विधेयक अद्यापही का आणलेले नाही? गुजरातमध्ये लोकायुक्त का बसवला नाही? असेही प्रश्न राहुल गांधी यांनी विचारले आहेत.

मी देशाचा पंतप्रधान म्हणून नाही तर चौकीदार म्हणून काम करेन असे तुम्ही म्हटला होतात. असे असतानाही नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि त्याच्यासारखे इतर पळून कसे गेले? त्यावेळी तुम्ही काय करत होतात? फक्त मोठ मोठी भाषणे दिल्याने काहीही होत नाही देशाला कृती हवी आहे. कारवाईचे आश्वासन दिले पण कारवाई का केली नाही? असेही राहुल गांधी यांनी विचारले आहे. कर्नाटकच्या रामदुर्गा या ठिकाणी झालेल्या रॅलीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त भाषणे देतात. त्यांनी हे लक्षात ठेवावे की देशाने त्यांना फक्त भाषणे देण्यासाठी आणि आश्वासने देण्यासाठी पंतप्रधान म्हणून निवडून दिलेले नाही.