नवी दिल्ली : भारताची करोनाविरोधातील लढाई आता लोकच चालवित आहेत त्यात सर्वाचे योगदान आहे, त्याची भविष्यकाळातही चर्चा होत राहील. करोना अजून काही ठिकाणी नसला तरी लोकांनी आत्मसंतुष्टतेतून गाफील राहू नये त्यासाठी पुरेशी प्रतिबंधात्मक काळजी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात केले.

ते म्हणाले की, यावेळच्या कार्यक्रमासाठी पूर्वीपेक्षा सर्वाधिक दूरध्वनी आले, लोकांनी वेगवेगळ्या सूचना केल्या. त्यामुळे लोकांच्या मनातील गोष्टी आपल्याला समजल्या आहेत. लोकांच्या सूचनांतून नेहमीच्या गडबडीतून दुर्लक्षित राहिलेल्या अनेक गोष्टी लक्षात आल्या आहेत. करोनाविरोधातील लढाई ही आता जनतेची झाली आहे, आता लोक व प्रशासन हे सहकार्यातून करोनाविरोधात लढत आहेत. उद्योग, कार्यालये, शिक्षण संस्था, वैद्यकीय क्षेत्र या सर्वच क्षेत्रातील लोकांनी करोना नंतरच्या जगातील बदल स्वीकारले आहेत. भारतासारखा महाकाय देश हा विकासासाठी आतुर आहे. दारिद्रय़विरोधात तर आपली लढाई सुरूच आहे आता  करोनाविरोधातील लढाईतही लोक सामील झाले आहेत. या लढाईत प्रत्येक नागरिक आता सैनिकासारखा काम करीत आहे. भविष्यकाळात जेव्हा करोना विरोधातील साथीची चर्चा होईल तेव्हा भारतातील लोकांनी चालवलेल्या करोना विरोधी लढय़ाची नेहमीच आठवण राहील. भारताने अनेक देशांना औषधांची केलेली मदत ही सहकार्याच्या भावनेतून आहे, जगातील नेते जेव्हा भारताचे आभार मानतात तेव्हा अभिमान वाटल्यावाचून राहत नाही.

आपल्या तीस मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी करोनाविरोधातील लढाईत राज्य सरकारांनी पार पाडलेल्या कामगिरीचे कौतुक केले. राज्यांनी सक्रिय भूमिका बजावली असे ते म्हणाले. २९ मार्च रोजी मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी देशाची क्षमायाचना करतानाच केवळ करोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी टाळेबंदी लागू करावी लागली असे म्हटले होते. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी टाळेबंदीची मुदत ३ मे पर्यंत वाढवली होती.

करोना विषाणू तुमचे शहर, खेडे, कार्यालय येथे पोहोचला नाही म्हणून भ्रमात राहू नका, अति उत्साह अंगाशी येऊ शकतो. जगाचा अनुभव आपल्यासमोर आहे त्यामुळे आत्मसंतुष्ट राहून गाफील राहू नका. ‘सावधानी हटी तो दुर्घटना घटी’ हे कायम लक्षात ठेवा.

-नरेंद्र मोदी, पंतप्रधान