गुजरात निवडणुकांचा रणसंग्राम सध्या शिगेला पोहचला आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांमध्ये सध्या राजकीय घमासान सुरू आहे. राफेल विमानांच्या खरेदीवरून राहुल गांधी यांनी शनिवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. मात्र रविवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशातील अमेठीमधले लोक रोजगारासाठी, नोकरी मिळवण्यासाठी गुजरातमध्ये येतात असे म्हणत त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

राहुल गांधी हे त्यांच्या प्रचारादरम्यान कायम गुजरातचा आणि देशाचा विकास काय झाला असा प्रश्न विचारतात. मात्र अनेक वर्षांपासून गांधी घरण्याचा मतदारसंघ असलेल्या अमेठीत काय विकास झाला ते आधी राहुल गांधी यांनी पाहावे आणि मग आम्हाला जाब विचारावा असेही अमित शहा यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणालाही विश्वासात न घेता राफेल विमानांच्या खरेदी करारात बदल केले. फ्रान्सला गेले असताना त्यांनी परस्पर निर्णय घेतला. ज्या कंपनीला विमान निर्मितीचा काहीही अनुभवही नाही अशा कंपनीला त्यांनी कंत्राट दिले कारण या कंपनीचे मालक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र आहेत, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. याच टीकेला शनिवारी अर्थमंत्री अरूण जेटली यांनीही उत्तर दिले होते. त्यानंतर आता रविवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही राहुल गांधींवर टीकेचे बाण चालवले आहेत.

वस्तू आणि सेवा कर आणि नोटाबंदी या निर्णयांवरूनही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या निर्णयांमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असेही राहुल गांधी यांनी म्हटले होते. गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. रविवारी अमित शहा यांनी राहुल गांधींच्या आणि गांधी घराण्याचा मतदारसंघ असलेल्या अमेठीचा उल्लेख करत काँग्रेसवर टीकेचे ताशेरे झाडले आहेत. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

दोनच दिवसांपूर्वी झालेल्या भाषणात अमित शहा यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. काँग्रेस सत्तेत असताना, ‘नर्मदा विकास योजना का लटकवण्यात आली?’ , ‘कच्छच्या वाळवंटासाठी विशेष निधी का देण्यात आला नाही?’, ‘गांधीनगरसाठी यूपीए सरकारने निधी का दिला नाही?’ असे प्रश्न अमित शहा यांनी उपस्थित करत काँग्रेसवर टीका केली होती. ज्यानंतर राहुल गांधी यांनी राफेल विमानांच्या खरेदीवरून सरकारवर टीका केली. याच टीकेला रविवारी अमित शहा यांनी खरमरीत उत्तर देत अमेठीच्या विकासावरून राहुल गांधींना सुनावले आहे.