अॅमेझॉनचे संस्थापक व ब्ल्यू ओरिजिन कंपनीचे मालक जेफ बेझोस यांनी काही दिवसांपूर्वी अंतराळ सफारी केली. अंतराळ सफारीसाठी वापरण्यात आलेले न्यु शेफर्ड हे खासगी यान अमेरिकेतील ब्ल्यू ओरिजिन या स्पेस कंपनीने तयार केले होते. गेला महिनाभर जेफ बेझोस आणि त्यांच्या अंतराळ सफारीची चांगलीच चर्चा झाली होती. आता एका व्हायरल व्हिडिओमुळे जेफ बेझोस पुन्हा चर्चेत आले आहेत. दोन दशकांपूर्वी बेझोस यांनी एका मुलाखतीत अंतराळ सफारी करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यांच्या त्या वक्तव्यानंतर त्या कार्यक्रमातील प्रेक्षकांमध्ये हशा पिकला होता. हा व्हिडिओ उद्योगपती हर्ष गोयंका यांनी ट्विटरवर शेअर केलाय.

“तुम्ही जर अमेझॉनचे सीईओ नसता, तर तुम्हाला काय करायला किंवा व्हायला आवडलं असतं?” असा प्रश्न मुलाखतकार रोज यांनी बेझोस यांना विचारला होता. तेव्हा बेझोस म्हणाले की, “मला अवकाशात जाऊन अंतराळाचा शोध घेणं आवडलं असतं. हे ऐकून बऱ्याच जणांना विश्वास बसणार नाही, मात्र हेच खरं आहे. मी मस्तपैकी एका रॉकेटमध्ये बसून, अंतराळात जाऊन नव्या गोष्टींचा शोध घेतला असता.” बेझोस यांनी असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांमधून हसण्याचा आवाज ऐकू येतो.

यावर रोज त्यांना म्हणाले, “ की जर तुम्ही तुमचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा गांभीर्यानं विचार कराल तर तुम्ही नक्कीच एखादा मार्ग शोधू शकाल, पण त्यामुळे तुमचे संचालक मंडळ आणि स्टॉक मालक कदाचित आनंदी होणार नाहीत.” त्यावर बेझोस म्हणाले की, “खरंच ही गोष्ट खूप कठीण आहे.”

उद्योगपती हर्ष गोयंका यांनी हे ट्विट केल्यानंतर अनेक युजर्सनी त्यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलंय की “सामान्य लोक बेझोससारख्या विलक्षण बुद्धीच्या लोकांवर नेहमीच हसतात. त्यांना तेच करायला आवडतं, याआधी अनेक लोक बिल गेट्स आणि स्टिव्ह जॉब्सवर देखील हसले होते.” तर दुसरा एक युजर म्हणाला की “जेव्हा आपण काहीतरी वेगळं पहिल्यांदा ऐकतो तेव्हा ते सत्यात उतरू शकत नाही, असं आपल्याला वाटतं, पण तसं नसतं.”

दरम्यान, २० जुलै रोजी जेफ बेझोस यांनी त्यांची पहिली अवकाश यात्रा पूर्ण केली. यावेळी बेझोस यांच्यासोबत त्यांचे भाऊ, नेदरलँडमधील एक तरुण आणि एक वृद्ध महिला होती.