हिंदू दहशतवादाबद्दल वक्तव्य करणारे अभिनेते कमल हसन यांच्यावर टीका करताना हिंदू महासभेचे नेते अशोक शर्मा यांच्या जीभेवरचा ताबा सुटला. कमल हसन यांच्यासारख्यांना गोळ्या घातल्या पाहिजे असे बेताल विधान शर्मा यांनी केले आहे.

कमल हसन यांनी काही दिवसांपूर्वी हिंदू दहशतवादावर परखड मत मांडले होते. पूर्वीचे कट्टर हिंदू चर्चा करण्यावर विश्वास ठेवत, पण आताचे हिंदू हिंसेत सहभागी होतात, अशी टीका त्यांनी केली होती. हिंदू शिबिरांमध्ये आता दहशतवाद घुसला असल्याची टीकाही त्यांनी  लेखात केली होती. एका मासिकासाठी त्यांनी हा लेख लिहीला होता. कमल हसन यांच्या टीकेवरुन वाद निर्माण झाला होता.

कमल हसन यांच्या विधानावर टीका करताना हिंदू महासभेचे नेते अशोक शर्मा यांनी बेताल विधान करुन नवा वाद निर्माण केला आहे. स्वतःचा जातीय अजेंडा पुढे नेण्यासाठी काही लोक हिंदू दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. अशा लोकांना हाताळण्याची एकच पद्धत आहे. या लोकांना फासावर लटकवा किंवा त्यांना गोळ्या घालून ठार मारा, असे चिथावणीखोर विधानही त्यांनी केले. अशोक शर्मा यांच्या विधानावर चोहोबाजूंनी टीका होत आहे.

प्रकाश राज यांनीदेखील हिंदू धर्मांधतेवर टीका करत कमल हसन यांच्या भूमिकेचे समर्थन केले होते. धर्म, संस्कृती आणि नैतिकतेच्या नावाखाली भीती निर्माण करणे हा दहशतवाद नाही तर का, असा प्रश्न त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला होता. नैतिकतेच्या नावावर भर रस्त्यात तरुण जोडप्यांना धक्काबुक्की करणे हा दहशतवाद नाही का असा सवालही त्यांनी विचारला होता.