दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला मारत लोकांना मनमोहन सिंग यांच्यासारख्या सुशिक्षित पंतप्रधानाची कमतरता जाणवत असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे केजरीवाल आज जरी मनमोहन सिंग यांची स्तुती करत असले तरी २०१३ च्या दिल्ली विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत मनमोहन यांना धारेवर धरलं होतं.

अरविंद केजरीवाल यांनी रुपयाचं मूल्य कमी होत असल्याच्या विषयावरील वॉल स्ट्रिट पत्रिकेतील एक बातमी ट्विटरवर शेअर करत लिहिलं आहे की, ‘लोकांना मनमोहन सिंग यांच्यासारख्या सुशिक्षित पंतप्रधानाची कमतरता जाणवत आहे. आपला पंतप्रधान सुशिक्षित असला पाहिजे असं लोकांना वाटत आहे’. महत्वाचं म्हणजे याआधी आम आदमी पक्षाने आणि स्वत: केजरीवाल यांनी अनेकदा नरेंद्र मोदींच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सध्या दिल्लीत उभं राहिल्या पाणी समस्येवर बोलताना घाणेरडं राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला. त्यांनी ट्विटरवर लिहिलं की, ‘भाजपा दिल्लीकरांसोबत घाणेरडं राजकारण करत आहे. दिल्लीला २२ वर्षांपासून पाणी मिळत होतं. अचानक हरियाणामधील भाजपा सरकारने पाणी बंद केलं आहे. असं का ? कृपया आपल्या घाणेरड्या राजकारणाने लोकांना त्रास देऊ नये’.

पोटनिवडणुकीच्या निकालावर बोलताना अरविंद केजरीवाल यांनी लोक नरेंद्र मोदी सरकारवर नाराज असून त्यांना हटवायचं आहे असं म्हटलं. ‘निकालावरुन जनता मोदी सरकारवर नाराज असल्याचं स्पष्ट होतंय. लोकांना त्यांना हटवायचं आहे’, असं केजरीवाल बोलले आहेत.