कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी बुधवारपासून राज्यातील करोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेली क्षेत्र वगळता लॉकडाउन होणार नाही असं जाहीर केलं आहे. इतर राज्यांप्रमाणे करोना विषाणूचा विळखा कर्नाटकालाही बसला होता. यावर उपाय म्हणून बंगळुरु आणि इतर महत्वाच्या भागांमध्ये कर्नाटक सरकारने लॉकडाउनची घोषणा केली होती. या लॉकडाउनचा कालावधी बुधावरी संपल्यानंतर कन्टेनमेंट झोनचा अपवाद वगळात राज्यात लॉकडाउन होणार नाही असं येडियुरप्पांनी जाहीर केलं आहे. करोना विषाणूचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आयोजित केलेल्या उपाययोजनांची माहिती देत असताना येडियुरप्पांनी ही घोषणा केली.

“उद्यापासून राज्यात लॉकडाउन होणार नाही. लोकांनी आता कमावर परतायला हवं. अर्थव्यवस्थेला हातभार लागणं हे गरजेचं आहे. अर्थव्यवस्था सुरळीत राखून आपल्याला करोनाचा सामना करायचा आहे. लॉकडाउन हे समस्येवरचा उपाय नाही. कन्टेनमेंट झोनचा अपवाद वगळता आता कुठेही निर्बंध नसतील.” यावेळी बोलत असताना येडियुरप्पांनी राज्यातील जनतेला सरकारने आखून दिलेले सर्व नियम पाळण्याचं आवाहन केलं. बाहेर जाताना मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, स्वच्छता यासारख्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असल्याचं येडियुरप्पा म्हणाले. सध्याच्या घडीला करोनाचा सामना करण्यासाठी हाच उपाय असल्यामुळे नागरिकांनी सरकारी यंत्रणांना मदत करावी असं आवाहनही येडियुरप्पांनी केलं.

राज्यात करोनाचा सामना करण्यासाठी तज्ज्ञ मंडळींनी 5T ची स्ट्रॅटजी सुचवली आहे. ज्यात Trace, Track, Test, Treat and Technology अशा पाच टप्प्यांमध्ये करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार होत आहेत. सुरुवातीला कर्नाटकात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या आटोक्यात होती. पण त्यानंतर महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधून येणाऱ्या लोकांमुळे राज्यातील रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं येडियुरप्पा म्हणाले. सोमवारी कर्नाटकात ३ हजार ६४८ नवीन रुग्ण सापडले. आतापर्यंत राज्यात १ हजार पेक्षा जास्त रुग्णांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.