कलम ३७० हटवण्यात आल्यामुळे सूना म्हणून आता काश्मीरातील मुलीही आणू शकतो अस राज्यातील लोक म्हणू लागले आहे, असे विधान हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे.

स्त्रीभ्रुण हत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती मनोहरलाल खट्टर यांनी फतेहबाद येथील एका सभेत दिली. स्त्रीभ्रुण हत्या आणि घटत्या लिंगगुणोत्तरामुळे हरयाणा कुप्रसिद्ध झाला होता. मात्र, बेटी बचाओ, बेटी पढाओसह अनेक योजना सरकारने आणल्या. त्यामुळे एक हजार पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण ८५० वरून ९३३ इतके वाढले आहे. सामाजिक बदलाच्या दिशेने हे मोठे काम आहे.

यावेळी काश्मीरमधील कलम ३७० विषयी बोलताना खट्टर म्हणाले, आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री धनकर म्हणायचे की मुलांची संख्या वाढली आणि मुलींची कमी झाली तर त्यांच्या लग्नासाठी बिहारमधून मुली आणू. पण, जेव्हापासून काश्मीरातील कलम ३७० हटवण्यात आले तेव्हापासून लोक म्हणत आहेत की, आता काश्मीरातील मुली सूना म्हणून आणू शकतो. हा विनोदाचा भाग झाला. आता हरयाणाचे लिंगगुणोत्तर वाढले आहे. स्त्री-पुरूष गुणोत्तराचे संतुलन ठेवल्यास समाजातील स्थिती पुर्वपदावर येईल, असेही खट्टर म्हणाले. हरयाणाचे मुख्यमंत्री असण्याबरोबरच खट्टर भाजपाचे नेते आहे. वादग्रस्त विधानामुळे ते नेहमी चर्चेत राहिले आहेत. गेल्या वर्षी बलात्काराच्या वाढत्या घटनांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.