24 January 2019

News Flash

विकृतीचा कहर! पॉर्न साइट्सवर शोधला जातोय कठुआ बलात्काराचा व्हिडिओ

विकृतीचा कहर म्हणावा अशी एक बातमी समोर येते आहे. पॉर्न साइट्सवर आता कठुआ बलात्काराचा व्हिडिओ शोधला जातो आहे.

संग्रहित छायाचित्र

जम्मू काश्मीरमधील कठुआ या ठिकाणी एका चिमुरडीवर बलात्कार झाला. त्यानंतर तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. मात्र तिच्या हत्येनंतर आणि तिच्यावर झालेल्या पाशवी बलात्कारानंतरही तिच्या यातना संपलेल्या नाहीत. विकृतीचा कहर म्हणावा अशी एक बातमी समोर येते आहे. पॉर्न साइट्सवर आता कठुआ बलात्काराचा व्हिडिओ शोधला जातो आहे. पॉर्न साइट्सवर अनेक विकृत नेटकऱ्यांकडून कठुआत झालेल्या या बलात्काराचा व्हिडिओ सर्च केला जातो आहे. समाजातली मानसिकता कोणत्या विकृत आणि किळस आणणाऱ्या थराला गेली आहे त्याचेच हे द्योतक म्हणावे लागेल.

‘Forced Sex in India’, ‘Kathua rape video’ हे सध्या पॉर्न साइटवरच्या सर्वाधिक सर्चमध्ये असलेले ट्रेंड्स आहेत असा एक अहवालच इंडियाटाइम्स डॉटकॉमने जाहीर केला आहे. बलात्काराचा व्हिडिओ पाहण्यात भारतीय आघाडीवर आहेत असे हा अहवाल सांगतो. एका चिमुरड्या मुलीवर बलात्कार केला जातो. ती मुलगी त्या अमानुष अत्याचारांनंतर ठार केली जाते आणि तरीही तिच्यावर झालेल्या बलात्काराचा व्हिडिओ शोधण्यात लोक धन्यता मानतात याला नेमके काय म्हणायचे हा विचार केला तरीही मन सून्न होते.

उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि जम्मू काश्मीरमधील कठुआ या दोन ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला. या दोघींना न्याय मिळाला पाहिजे. बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी एकीकडे समाजातल्या विविध स्तरांमधून होते आहे. ट्विटर आणि फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइट्सवरही अनेक नेटकरी कठुआ आणि उन्नाव प्रकरणातल्या बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत आहेत. अशात पॉर्न साइट्स पाहणाऱ्यांची किळसवाणी मानसिकता याच देशात समोर आली आहे.

First Published on April 16, 2018 7:43 pm

Web Title: people searching for kathua rape videos on porn sites