देशभरात बकरी ईद उत्साहात साजरा केली जात असताना दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये आंदोलकांकडून सुरक्षा दलावर दगडफेक करण्यात येत आहे. काही आंदोलकांनी पाकिस्तान आणि आयसिसचे झेंडे फडकवले. जमावामध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. हे युवक सुरक्षा दलावर दगडफेक करत आहेत. जमावाला पांगवण्याचा सुरक्षा दलाकडून प्रयत्न सुरू आहे. यापूर्वीही जमावाकडून काश्मीरमध्ये आयसिस आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आले होते. दरम्यान, अनंतनाग येथेही आंदोलकांनी पोलिसांच्या पेट्रोलिंग वाहनावर तुफानी दगडफेक केली. अनंतनाग येथे अत्यंत तणावाचे वातावरण आहे. कुलगाम येथेही दहशतवाद्यांनी एका पोलिसाला ठार केले आहे.

बुधवारी सकाळी श्रीनगर येथे अनेक ठिकाणी बकरी ईदसाठी नमाज पठण केले गेले. त्याचवेळी काही आंदोलक येथे जमा झाले आणि त्यांनी बंदोबस्तासाठी असलेल्या सुरक्षा दलावर दगडफेक करण्यास सुरूवात केली. त्यावेळी काही हुल्लडबाज युवकांनी आपल्या हातात आयसिस आणि पाकिस्तानचे झेंड घेतले होते. ते सुरक्षा दलाला दाखवत त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, कुलगाम येथील झाजरीपुरा येथे ईदगाहच्या बाहेर दहशतवाद्यांनी एका पोलिसावर गोळीबार केला असून यात त्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. याबाबत अधिक माहिती समजू शकलेली नाही.