गुजरातमधील नवसारीतील एका लोक गायिकेवर भजन कार्यक्रमादरम्यान नोटांचा पाऊस पाडण्यात आला आहे. भजन कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांनी एक, दोन नव्हे, तर हजारो नोटा गायिकेवर उधळल्या आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने भजनाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. लोकगायिकेवर होणारी हजारो रुपयांची उधळपट्टी एएनआयच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

भजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होताच उपस्थित लोक भजन ऐकण्यात तल्लीन झाले. यानंतर थोड्या वेळाने उपस्थितांपैकी काही लोक व्यासपीठावर आले. या लोकांनी १० आणि २० रुपयांच्या नोटांची मुक्तपणे उधळण सुरू केली. नोटांची ही उधळण काही मिनिटे अखंडितपणे सुरू होती. या दरम्यान हजारो रुपयांची उधळण करण्यात आली. गायिकेवर हजारो रुपयांची उधळण करणाऱ्यांमध्ये महिला, पुरुष आणि लहानग्यांचाही समावेश होता.

याआधीही गुजरातच्याच नवसारीमध्ये गुर्जर क्षत्रिय कडिया समाजाच्या एका भजन समारंभात ४० लाख रुपयांच्या नोटा उधळण्यात आल्या होत्या. भजन गायकावर उपस्थितांकडून नोटांचा पाऊस पाडण्यात आला होता. विशेष म्हणजे लोक नोटाबंदीमुळे त्रस्त झाले असताना आणि सुट्ट्या पैशांच्या अभावी लोकांचे हाल होत असताना नवसारीत नोटांची उधळपट्टी करण्यात आली होती. याआधी जामनगरमधील एका भजन कार्यक्रमात प्रख्यात गायक किर्तीदान गढवी यांच्या भजनाच्या कार्यक्रमात नोटांचा पाऊस पाडण्यात आला होता. या कार्यक्रमात लोकांनी तब्बल साडे चार कोटी रुपये उधळले होते.