अहमदाबाद : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेचा ठोस पाठिंबा आहे, त्यामुळे आगामी सरकार आमचेच असेल, असा दावा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी येथे केला.

मेरा परिवार— भाजप परिवार या संपर्क मोहिमेचे उद्घाटन त्यांनी गुजरात येथे केले. त्या वेळी त्यांनी सांगितले, की आगामी लोकसभा निवडणुका या भारताला महाशक्ती करण्याच्या दिशेने महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे लोकांची भाजपला साथ आहे.

‘मी देशभर फिरलो आहे. त्यात लोक पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत व त्यांचा पाठिंबा त्यांच्या डोळ्यातूनच दिसून येत होता’,  असे शहा म्हणाले.

विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, की महागठबंधन ही आघाडी राज्यपातळीवरील नेत्यांची आहे, त्याचा भाजपच्या निवडणूक यशावर काहीही परिणाम होणार नाही.

अमित शहा यांनी त्यांच्या स्वत:च्या घरावर भाजपचा झेंडा लावून संपर्क मोहिमेस सुरूवात केली. देशातील भाजपच्या मतदारांनी या मोहिमेत त्यांच्या घरावर पक्षाचे ध्वज फडकवावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

विरोधी आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण..

‘जर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी गुजरातमध्ये, किंवा पश्चिम बंगालमध्ये, ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रात, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केरळात भाषणे दिली तर काय होईल. त्याचा काहीही परिणाम होणार नाही, कारण ते राज्य पातळीवरचे नेते आहेत. कार्यकर्त्यांनी कुठलीही चिंता करू नये कारण विरोधकांना आगामी निवडणुकीत संधी नाही. गठबंधनच्या नेत्यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा, त्यांचा नेता कोण आहे, कोण देश चालवणार आहे हे त्यांनी ठरवलेले नाही, आमच्याकडे (एनडीए) मोदी यांचे नाव निश्चित आहे, उत्तर प्रदेशात यंदाच्या निवडणुकीत ७४ पेक्षा कमी जागा भाजपला मिळणार नाहीत’,  असेही ते म्हणाले.