भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून भाजपने लोकांचा काही प्रमाणात भ्रमनिरास केला असून ही बाब अतिशय क्लेशकारक आहे, अशी कबुली भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी शनिवारी येथे दिली.
देशभरात सध्या काँग्रेसविरोधी वातावरण आहे. काँग्रेसकडून होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. मात्र मला हे खेदाने कबूल करावेसे वाटते की भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर काही प्रमाणात भाजपकडेही याच दृष्टीने बघितले जाते. भाजपकडून झालेल्या या भ्रमनिरासाचे फार वाईट वाटते, असे ते म्हणाले.
अडवाणी यांचा मुख्य रोख दोन वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये झालेल्या उलथापालथीकडे होता. कोणाचाही भ्रष्टाचार खपवून घ्यायचा नाही, असे आमच्या पक्षाचे धोरण असताना येडियुरप्पा यांच्याबाबतीत निर्णय घेण्यास जो विलंब झाला, तो अतिशय धक्कादायक व निराशाजनक होता, असे त्यांनी नमूद केले. तत्कालीन पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी अप्रत्यक्षपणे अभय दिल्याने येडियुरप्पा यांची मुख्यमंत्रीपदावरून झालेली गच्छंती लांबली होती. गडकरी हे अडवाणींच्या विशेष मर्जीतील नसल्याने भ्रमनिरासाचे हे विधान करून त्यांनी गडकरी यांना लक्ष्य केल्याचे मानले जात आहे.