कुलभूषण जाधव यांच्या पत्नीचे बूट पाकिस्तानने ठेवून घेतले. त्यांच्या बुटामध्ये धातूसदृश काही वस्तू असल्याचे स्पष्टीकरण पाकिस्तानने दिले आणि भेटीनंतर दोन दिवसांनी ते बूट भारतात पाठवले. मात्र कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला आणि आईला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पाकिस्तानला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले. कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला आणि आईला मिळालेली वागणूक अपमानास्पद होती यावरून तर पाकिस्तानवर टीका झालीच. पण कुलभूषण जाधव म्हणजे भारतीय दहशतवादाचा चेहरा आहे असे वक्तव्य जेव्हा पाकिस्तानकडून आले तेव्हाही पाकिस्तानवर चांगलीच टीका झाली.

कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी जेव्हा त्यांची आई आणि पत्नी पाकिस्तानात गेल्या होत्या तिथे त्यांना भेटीआधी मंगळसूत्र काढून द्यावे लागले, बूट बदलावे लागले. तसेच कपडेही बदलून जाधव यांना भेटावे लागले. या भेटीची चर्चा जेवढी रंगली तेवढीच पाकिस्तानने दिलेल्या वाईट वागणुकीचीही चर्चा रंगली. जाधव यांच्या पत्नीच्या बुटांमध्ये धातूसदृश काही पदार्थ होता असे स्पष्टीकरण पाकिस्तानने दिले.

पाकिस्तानच्या या स्पष्टीकरणानंतर भाजपाचे दिल्लीचे प्रवक्ते तजिंदर बग्गा यांनी अॅमेझॉनची स्लिपर बुक केल्याची ऑर्डर पाकिस्तानसाठी केली. पाकिस्तानला आमच्या स्लीपर्स हव्या आहेत म्हणून त्या देशासाठी आणि त्यांच्या आयुक्तालयासाठी मी या चपला ऑर्डर करतो आहे असा खोचक ट्विटक बग्गा यांनी केला.

त्यानंतर पाकिस्तानला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांची रांगच लागली. #JutaBhejoPakistan हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आला. बग्गा यांच्याप्रमाणेच अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवरून चपलांची ऑनलाईन ऑर्डर दिली आणि त्याचे स्क्रीन शॉट काढले तसेच पाकिस्तानसाठी या चपला खरेदी केल्याचे ट्विटही केले. आम्ही पाठवत आहोत त्या चपला विका म्हणजे तुमच्या पंतप्रधानांना आणि राष्ट्रपतीला दोन वेळचे जेवायला मिळेल असा खोचक ट्विटही यावेळी करण्यात आला.