सोशल मीडियावर असामाजिक विषयांचीच मोठी चर्चा होतो. ज्या लोकांना राजकारणातील एबीसीडी माहीत नसते ते लोक आज सोशल मीडियावर राजकीय तज्ज्ञ म्हणून वावरतात, असा टोला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लगावला. पाटणा येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

राजकीय समज कमी असलेलेच लोक सोशल मीडियावर व्यक्त होत असल्याचे नितीश कुमारांनी म्हटले. चारा घोटाळ्यातील चाईबासा कोषागारप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा व ५ लाख रूपये दंड ठोठावला आहे. यावर लालूंचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी भाजपा आणि नितीश कुमार यांनी लालूंना अडकवण्यासाठी हा कट रचल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना नितीश कुमार म्हणाले, आम्ही याप्रकरणी काहीही केलेले नाही. हा न्यायालयीन निर्णय आहे. यावर आम्ही काहीच प्रतिक्रिया देणार नाही. न्याय व विकासाचा अजेंडा राबवण्यासाठी आम्ही कधीच तडजोड करणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तत्पूर्वी, तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार आणि भाजपवर टीका केली होती. लालूंना या प्रकरणात फसवल्याचे बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. भाजपा, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि खासकरून नितीश कुमार लालूंना फसवण्यामागे लागले आहेत. कशाही पद्धतीने लालूजींना अडकवायचे हे त्या लोकांचे टार्गेटच आहे. बिहारच्या विकासाऐवजी हे लोक लालूंना दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे तेजस्वी यादव म्हणाले होते.

इथे लोकांमध्ये खूप राग आहे. पण हा न्यायालयाचा निर्णय आहे, त्याचा आम्ही सन्मान करतो. आम्ही उच्च न्यायालयात अपील करणार आहोत. आम्ही जनतेच्या न्यायालयातही जाणार आहोत. उच्च न्यायालयात आम्हाला दिलासा मिळेल अशी आशा आहे. तर दुसरीकडे आरजेडीचे ज्येष्ठ नेते रघुवंश प्रसादसिंह यांनीही या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले.