गोरखपूरमधील बाबा राघवदास रुग्णालयातील बालमृत्यूप्रकरण ताजे असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ‘आता मुले दोन वर्षांची झाली की त्याची जबाबदारी सरकारवर टाकावी असे लोकांना वाटत असावे’ असे विधान योगी आदित्यनाथांनी केले आहे.

उत्तर प्रदेशमधील एका कार्यक्रमात बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ म्हणाले, प्रसारमाध्यमं म्हणतात सर्वत्र कचरा पसरला आहे. कचरा साफ करण्याची जबाबदारी सरकारवर आहे हे मान्य आहे. पण हल्ली जनता सर्व जबाबदारीतून मुक्त झाल्याचे वाटते. लोक स्वत: साफसफाई करणार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपण आपली जबाबदारी सरकारकडे सोपवली. मला कधी कधी तर वाटते की आता लोक मुले दोन वर्षांची झाली की त्याची जबाबदारी सरकारवर टाकतील असे त्यांनी म्हटले आहे. हे विधान करत योगी आदित्यनाथांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे.

‘लोक घरात गाय आणतील, तिचे दुध विकतील पण याच गायी काही वर्षांनी रस्त्यावर सोडून देतील, या गायींसाठी सरकारने गोशाळा सुरु करावी अशी मागणी केली जाते. गायीचे दुध पिणार तुम्ही. पण गायीसाठी चारा आणण्याचे आणि शेण उचलण्याचे काम सरकारने करावे अशी लोकांची भावना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गोरखपूर येथील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑगस्टमध्ये २९० बालकांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला प्राणवायूअभावी रुग्णालयातील ६० हून अधिक बालकांचा मृत्यू झाला होता. यावरुन योगी आदित्यनाथ सरकारवर टीका होत असून या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथांनी केलेल्या विधानामुळे अडचणीत आले आहे.