‘पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन’ (पीएजीडी)च्या सदस्यांच्या आज झालेल्या बैठकीत एक महत्वपूर्ण व मोठा निर्णय घेण्यात आला. पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशनने जम्मू-काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदांची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, यासाठी सर्व स्थानिक पक्षांना सोबत घेतलं जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

‘पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन’ चे नेते सज्जाद लोन यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती देताना सांगितले की, या संदर्भात जम्मूमधील अनेक राजकीय पक्षांशी चर्चा करण्यात आलेली आहे. बैठकीत डीडीसी निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. पीएजीडीच्या मते सर्व राजकीय पक्ष मिळून डीडीसी निवडणूक लढतील. जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या एकसारख्या भावना आहेत. सर्वांचीच इच्छा आहे की आपण एकत्र यावं. सर्वजण ५ ऑगस्ट रोजी घेतलेल्या निर्णयावर नाराज आहेत.

दरम्यान, जम्मू-काश्मीरचे राज्य निवडणूक आयुक्त केके शर्मा यांनी २० जिल्हा विकास परिषदांसाठी निवडणुकीची व पंचायतींच्या पोटनिवडणुकांची घोषणा केलेली आहे. डीडीसी निवडणूक २८ नोव्हेंबर पासून २२ डिसेंबरपर्यंत आठ टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. कलम ३७० हटवण्यात आल्यापासूनची ही मोठी राजकीय घडामोड आहे.

काय आहे गुपकार ठराव –
अनुच्छेद ३७० ला पाठिंबा देण्यासाठी जो बहुपक्षीय निग्रह ४ ऑगस्ट रोजी दाखवण्यात आला, त्या निग्रहाला आणि त्या वेळी झालेल्या ठरावाला गुपकर ठराव असे संबोधले जाते. कारण, नॅशनल कॉन्फरन्स अध्यक्षांच्या श्रीनगरमधील गुपकार येथील निवासस्थानी तो संमत झाला होता. यामध्ये सांगण्यात आले आहे की, सर्व पक्षांनी सर्वसंमतीने निर्णय घेतला आहे की , जम्मू-काश्मीरची ओळख, स्वायत्तता आणि त्याचा विशेष दर्जाचे रक्षण करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू.