सुपरमॉडेल केंडाल जेन्नरचा सहभाग असलेली जाहिरात मागे घेत असल्याचे पेप्सी बुधवारी जाहीर केले आहे. ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ आंदोलनाचा वापर जाहिरातीसाठी करण्यात आल्याची टीका झाल्यानंतर पेप्सीकडून जाहिरात मागे घेण्यात आली. सामाजिक न्यायासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनाचा पेप्सीकडून फायद्याासाठी वापर केला जात असल्याची टीका समाज माध्यमांवरुन झाली होती. त्यानंतर पेप्सीने याबद्दल स्पष्टीकरण देत जाहिरात मागे घेतल्याचे जाहीर केले.

‘जागतिक एकतेचा, शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न पेप्सीकडून करण्यात आला होता. मात्र त्यात आम्ही अपयशी ठरलो. त्याबद्दल आम्ही माफी मागतो,’ असे पेप्सिकोने निवेदनात म्हटले आहे. ‘आम्हाला कोणत्याही गंभीर गोष्टीचे गांभीर्य कमी करायचे नाही. त्यामुळे आम्ही ती जाहिरात रद्द करत आहोत. या सगळ्यामध्ये केंडाल जेन्नरला सहभागी केल्याबद्दल आम्ही तिचीदेखील माफी मागतो,’ असे पेप्सीने निवेदनात म्हटले आहे.

पेप्सीच्या वादग्रस्त जाहिरातीत तृतीयपंथी टिव्ही स्टार केटलिन जेन्नर यांची मुलगी केंडाल जेन्नर आंदोलन सुरु असताना त्यात सहभागी होऊन रस्त्यावर चालताना दिसते आहे. यावेळी केंडाल जेन्नर उपस्थित असलेल्या पोलिसांपैकी एकाच्या हातात पेप्सीचे कॅन देते आणि यानंतर केंडालमागील आंदोलक जल्लोष करतात. पेप्सीच्या जाहिरातीवर सर्वच स्तरातून टीका झाली होती.

नागरी हक्कांसाठी लढणारे नेते मार्टिन ल्युथर किंग यांची मुलगी बर्निस किंग यांनी पेप्सीच्या जाहिरातीवर सडकून टीका केली होती. ‘माझ्या बाबांना पेप्सीचे सामर्थ्य माहित असते तर..?’ असा सवाल करत मार्टिन ल्युथर किंग यांचे पोलिसांना सामोरे जात असतानाचे छायाचित्र बर्निसने ट्विट केले आहे.

समाज माध्यमांवर अनेकांनी पेप्सीच्या जाहिरातीवर तोंडसुख घेतले आहे. पेप्सीच्या जाहिरातीमधील शेवटचा क्षण हा मागील वर्षी लुइझियानात झालेल्या ब्लॅक लाईव्हज मॅटर आंदोलनातील एका प्रसंगाशी साधर्म्य असलेला आहे. लुइझियानात झालेल्या आंदोलनात एक परिचारिका पोलिसांपर्यंत चालत गेली होती, अशा प्रतिक्रिया पेप्सीच्या जाहिरातीवर आल्या आहेत.