कार्यक्षमता, नियमितता, स्वच्छता आणि सेवांच्या क्षेत्रात रेल्वे कमालीची मागे असून या विभागाच्या कामकाज पद्धतीत व्यापक सुधारणा होणे आवश्यक आहे. रेल्वेचे सर्व महाव्यवस्थापक तसेच विभागीय व्यवस्थापकांनी याची दखल घेत कामात सुधारणा करून लक्षणीय कामगिरी दाखवावी अन्यथा सरळ घरी जावे, या स्पष्ट शब्दांत रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी रेल्वेच्या सर्व महाव्यवस्थापकांना गुरुवारी फैलावर घेतले.
भारतीय रेल्वे मोठय़ा संख्येने प्रवाशांची वाहतूक करते परंतु त्याचवेळी गाडय़ांची नियमितता, कार्यक्षमता, स्वच्छता आणि एकूण सेवाक्षेत्रात आपण कमालीचे मागे असल्याचे खडे बोल रेल्वेमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुनावले. पारंपारिक विचारपद्धती आणि सध्याची कार्यपद्धती पूर्णपणे बदलून वरील मुद्यांचे निराकरण करण्यासाठी नवीन कल्पना शोधा, असेही आवाहन सदानंद गौडा यांनी रेल्वेचे सर्व सरव्यवस्थापक आणि विभागीय व्यवस्थापकांच्या परिषदेत केले.साचेबद्ध पद्धतीने विचार करून या समस्या सुटणार नाहीत, असेही त्यांनी बजावले. एखाद्या समस्येवर केवळ कागदी घोडे नाचवून त्यांची बोळवण केली जाते. यापुढे अशा प्रकारची अकार्यक्षमता सरकार खपवून घेणार नाही, असे सांगत विद्यमान सरकारचा मंत्र आहे, ‘कामगिरी’ आणि लोकांना तातडीने ही कामगिरी दृष्टोपत्तीस आलेली दिसली पाहिजे, असे रेल्वेमंत्री गौडा यांनी नमूद केले. रेल्वेच्या सेवा, अन्नाचा दर्जा, आरक्षणाच्या समस्या याकडे लक्ष वेधणाऱ्या तक्रारींचा आपल्याकडे पूर आलेला असतो. यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा, असे आवाहन त्यांनी व्यवस्थापकांना केले. आपल्या गाडय़ा कायम विलंबाने का धावतात, अशी विचारणा करून जगभरातील बहुतेक गाडय़ा वेळेवर धावत असतात,याकडे त्यांनी लक्ष वेधले. पिण्याच्या पाण्याची समस्या, रेल्वेतून प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक व महिलांची सुरक्षा, प्रतिक्षालये आदी मुद्दय़ांवरही रेल्वेमंत्र्यांनी महाव्यवस्थापकांची कानउघाडणी केली.
 लोकांना केवळ इकडचा तिकडचा बदल नको असून त्यांना रेल्वेच्या कारभारात लक्षणीयरीत्या जाणवणारा बदल हवा आहे, असे सांगत उच्चवेगाने धावणाऱ्या गाडय़ा सुरू करण्यास आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारला पाच वर्षांचा कालावधी मिळालेला असला तरी लवकरात लवकर कामास सुरुवात करणे आवश्यक आहे.सरकारचा नियम रेल्वेच्या खालच्या कर्मचाऱ्यापासून थेट रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यापर्यंत सर्वाना लागू असल्याचेही गौडा म्हणाले. आपण मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्याकामी वरिष्ठ पातळीवर अडचणी येऊ शकतात. मात्र, रेल्वेचे चांगले नाव राहण्यासाठी तुम्ही माझ्याशी थेट संपर्क साधू शकता, असे आवाहनही रेल्वेमंत्र्यांनी यावेळी केले.
प्रवासी भाडेवाढ लवकरच
रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीची भाडेवाढ करण्यासंदर्भात आणि रेल्वेत परकीय गुंतवणुकीस परवानगी देण्यासंदर्भात येत्या रेल्वे अर्थसंकल्पापूर्वी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती गुरुवारी रेल्वे मंत्रालयाने दिली़  याबाबत सध्या चर्चा सुरू असून, त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे सदानंद गौडा यांनी सांगितल़े भाडेवाढीच्या प्रकरणावर सध्या आम्ही र्सवकष चर्चा करीत असून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये निर्णयाप्रत पोहोचू, असेही रेल्वेमंत्री म्हणाल़े  रेल्वेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेत चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होत़े  दरवाढीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येत्या एक-दोन दिवसांत भेटणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितल़े