नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी एका व्यक्तीस ४९ किलो मोरपिसांची तस्करी करताना अटक करण्यात आली आहे. नासीर अन्सारी (वय-३९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो ही मोरपीसं घेऊन एअर इंडियाच्या एआय-३१४ या विमानाने रात्री ११ वाजता हॉगकाँगसाठी रवाना होणार होता. यादरम्यान सीआयएसफच्या जवानांनी त्याला रंगेहाथ पकडले आहे.

विमानतळावर या व्यक्तीची हालचाल संशयी आढळल्याने सीआयएसएफच्या जवानांनी त्याच्या बॅगांची झडती घेतली असता, हा प्रकार उघड झाला. अन्सारीकडे मोठ्या आकाराच्या तीन बॅगा होत्या व तो ट्रॉलीद्वारे त्या घेऊन जात होता. यावेळी विमानतळ कर्मचाऱ्यांसह जवानांना त्याचा संशय आल्याने त्याच्या बॅगांची अगोदर मशीनद्वारे तपासणी करण्यात आली, यावेळी त्यांना बॅगेत काहीतरी वेगळे असल्याचे जाणवल्याने त्यांनी बॅगा उघडून पाहणी करण्यात आली.

बॅगांमध्ये मोठ्याप्रमाणावर मोरपीसं आढळल्यानंतर अन्सारीला ताब्यात घेण्यात आले व त्याची शारिरीक तपासणी देखील केल्या गेली. यानंतर अधिकाऱ्यांनी अन्सारीकडे ४९ किलो मोरपीसं आढळले असल्याची माहिती दिली व ४९ किलो मोरपिसांसह अन्सारीला कस्टम विभागाकडे पुढील कारवाईसाठी सोपवण्यात आले. वन्यजीव संरक्षण अधिनियम (डब्ल्यूपीए) १९७२ पासून भारतीय निर्यात-आयात धोरणानुसार मोरपिसांची निर्यातीवर बंदी आहे. अशा घटना सहसा वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्यूरोकडे (डब्ल्यूसीसीबी) सोपवल्या जातात.