करोनाची लक्षणे दिसत असलेल्या रुग्णांबाबत वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

नवी दिल्ली : करोना अर्थात  कोविड १९ ची लक्षणे दिसत असतानाही चाचणी नकारात्मक आली, तरी त्या व्यक्तीवर उपचार करण्याची गरज आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अशा व्यक्तीच्या बाबतीत करोना निश्चितीच्या चाचण्या करत वेळ घालवण्याच्या आधीच उपचार सुरू करणे हे प्रसार रोखण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले.

अनेक रुग्णांत लक्षणे दिसत असतात, पण कोविड १९ चाचणी नकारात्मक येते, अशा परिस्थितीत उपचारांसाठी वाट पाहण्याची गरज नाही. अनेक चाचण्या करूनही या रुग्णात चाचणी सकारात्मक येत नाही, पण लक्षणे मात्र दिसत असतात. बऱ्याच काळाने चाचणी सकारात्मक येते, तोपर्यंत त्या व्यक्तीची प्रकृती तर खालावतेच, पण करोनाचा प्रसारही त्या व्यक्तीकडून होऊ शकतो. अशा रुग्णांमध्ये सीटीस्कॅन अहवाल प्रमाणित मानून उपचार करावेत. आरटी-पीसीआर चाचणीवर अवलंबून राहू नये, कारण त्या चाचणीची संवेदनशीलता केवळ सत्तर टक्के आहे, असे सफदरजंग रुग्णालयाचे क्रिटिकल केअर व स्लीप मेडिसिन विभागाचे डॉ. नीरज गुप्ता यांनी सांगितले.

रॅपिड अँटिजेन चाचण्यांची संवेदनशीलता चाळीस टक्के आहे. त्यामुळे अशा चाचण्यांवर विसंबून चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात, असे सांगून ते म्हणाले की, अगदी सौम्य लक्षणे असतानाच या रोगावर उपचार सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी वाट पाहण्याची गरज नाही. प्रतिपिंड चाचण्यांची संवेदनशीलता ९० टक्के असते, पण त्या चाचण्यांचा उपयोग रोगाच्या आधीच्या अवस्थेत होत नाही.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील डॉ. विजय गुर्जर यांनी सांगितले, की अनेक वेळा रुग्णांच्या तीन-चार आरटी-पीसीआर चाचण्या नकारात्मक येऊनही त्यांच्यात लक्षणे दिसली आहेत. त्यात सीटीस्कॅनमध्ये न्यूमोनिया दिसून आला आहे, त्यातून कोविड १९ ची खात्री पटली आहे. त्यांच्या शरीरात विषाणूविरोधी प्रतिपिंड दिसून आले पण तरी आरटी-पीसीआर चाचण्या मात्र नकारात्मक आल्या. जर एखाद्या  व्यक्तीत लक्षणे दिसत असतील व त्या व्यक्तीला सहआजार असतील, तर तातडीने उपचार सुरू करण्याची गरज असते.

मौलाना आझाद इन्स्टिटय़ूट ऑफ डेंटल सायन्सेस या संस्थेच्या दंत चिकित्सा विभागातील डॉ. अभिषेक भयाना यांचा श्वास घेण्यात अडचण आणि घसा धरल्याची लक्षणे असताना मृत्यू झाला होता, पण त्यांची कोविड चाचणी नकारात्मक आली होती. पण त्यांच्या मृत्यूच्या अहवालात कोविडशी संबंधित लक्षणांचा समावेश होता.

फुप्फुसाचा सीटीस्कॅन महत्त्वाचा

अपोलो रुग्णालयाचे क्रिटिकल केअर व स्लीप डिसऑर्डर विभागाचे सल्लागार डॉ. निखिल मोदी यांच्या मते नमुने चुकीच्या पद्धतीने घेतल्याने चाचण्या चुकीच्या येतात. जेव्हा सतत चाचण्या नकारात्मक येतात, तेव्हा फुप्फुसाचा सीटीस्कॅन महत्त्वाचा मानावा.