अमेरिकेच्या ‘प्रथम महिला’ मिशेल ओबामा, उपाध्यक्ष जोई बिदेन यांच्यासह इतरही काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची खासगी माहिती रशियात पाळेमुळे असलेल्या एका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याने खळबळ उडाली आह़े  अमेरिकेने याची गंभीर दखल घेतली असून एफबीआय आणि अमेरिकी गुप्त सेवा संस्थेने या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू केली आह़े
या संकेतस्थळावर हॉलीवूडच्या अनेक तारे-तारकांचे आणि अमेरिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचीही खासगी माहिती देण्यात आली आह़े  त्यात एफबीआयचे संचालक रॉबर्ट मुल्लर, अ‍ॅटर्नी जनरल इरिक होल्डर आणि माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांचाही समावेश आह़े
गुप्त सेवा संस्था या प्रकरणाची चौकशी करीत आह़े  परंतु कार्यवाही सुरू असल्याने सध्या आम्ही त्यावर कोणतेही भाष्य करू इच्छित नाही, असे गुप्त सेवाचे प्रवक्ते ब्रिएन लेही यांनी सांगितल़े
या संकेतस्थळावर देण्यात आलेली काही जणांची माहिती अतिशय विस्तृत आह़े  मिशेल ओबामा आणि बिदेन यांचे ‘सामाजिक सुरक्षा क्रमांक’ही देण्यात आले आहेत़  मिशेल ओबामा यांच्या बँक ऑफ अमेरिकाच्या क्रेडिट कार्डवर गेल्या अडीच वर्षांच्या काळात १२ हजार ९४४ अमेरिकी डॉलरची शिलकी होती, असेही येथे दर्शविण्यात आले आह़े तसेच व्हाइट हाऊसमध्ये येण्यापूर्वी त्यांच्या बनाना रिपब्लिकच्या कार्डावरही ८८६ अमेरिकी डॉलरची शिलकी होती, असेही दर्शविण्यात आले आह़े  ‘तुझ्या पतीला दोष दे, आम्ही अजूनही तुझ्यावर प्रेम करतो’ असे संकेतस्थळ म्हणत़े