भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही वा लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत केलेल्या विधानाचा विपर्यास करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, असे स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयाने शनिवारी केले.

आपल्या जवानांनी दाखवलेल्या शौर्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारताकडील बाजूस चीनच्या सैनिकांचे अस्तित्व आढळत नाही, असे पंतप्रधान सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले होते, असेही पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात नमूद केले आहे.

पूर्व लडाखमध्ये भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही आणि लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत केले होते. त्या संदर्भात काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी शनिवारी सकाळी ट्वीट करून केंद्र सरकारला धारेवर धरले. चिनी सैनिक भारताच्या भूभागात घुसले नव्हते, तर मग जवान शहीद कसे झाले? जवान नेमके कुठे (भारताच्या की चीनच्या हद्दीत) शहीद झाले, असे प्रश्न विचारण्याबरोबरच चिनी आक्रमणासमोर पंतप्रधानांनी माघार घेतली, असा आरोप राहुल यांनी केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनीही शनिवारी पत्रकार परिषदेत पंतप्रधानांच्या सर्वपक्षीय बैठकीतील विधानाचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न केला.

चिदम्बरम यांच्या पत्रकार परिषदेनंतर तातडीने पंतप्रधान कार्यालयाने निवेदन प्रसिद्ध केले. गलवानमध्ये १५ जून रोजी २० जवान शहीद झाले. त्या अनुषंगाने पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत निवेदन केले होते. चिनी सैनिकांचा कुटील डाव उधळणाऱ्या शहीद जवानांच्या शौर्याला आणि देशप्रेमाला पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली होती. प्रत्यक्ष ताबा रेषेचे उल्लंघन केल्यास भारत तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देईल, असे पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले होते. पूर्वी मात्र प्रत्यक्ष ताबा रेषेवर झालेल्या उल्लंघनाकडे सातत्याने दुर्लक्ष केले गेले होते, परंतु आता भारतीय जवान असे कोणतेही उल्लंघन झाले तर ठोस कारवाई करतात. चिनी सैनिकांना रोखले जाते, जाब विचारला जातो, असे या निवेदनात म्हटले आहे.

प्रत्यक्ष ताबा रेषेवर चिनी सैनिक मोठय़ा संख्येने जमा झाले होते आणि भारतानेही त्यांना तितक्याच समर्थपणे प्रत्युत्तर दिले, अशी माहिती सर्वपक्षीय बैठकीत पक्षप्रमुखांना देण्यात आली. गलवान खोऱ्यात १५ जूनला झालेली धुमश्चक्री ही चीनने प्रत्यक्ष ताबा रेषेच्या नजीक (क्रॉस) बांधकाम करण्याचा प्रयत्न केल्याने आणि बांधकाम थांबवण्यास नकार दिल्याने झाली, असे स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयाने प्रत्यक्ष ताबा रेषेच्या उल्लंघनाच्या मुद्दय़ावर दिले, असेही या निवेदनात नमूद केले आहे.

भारताच्या नकाशावरून भारताचा भूभाग कोणता हे स्पष्ट होते. त्याचे रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या भूभागात घुसखोरीच्या मुद्दय़ासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत तेथील परिस्थितीची सविस्तर माहिती देण्यात आली. चीनने ६० वर्षांहूनही अधिक काळ ४३ हजार चौरस फुटांपेक्षाही जास्त भूभाग कोणत्या परिस्थितीत ताब्यात ठेवला याची देशाला पूर्ण कल्पना आहे. केंद्र सरकार प्रत्यक्ष ताबा रेषेत एकतर्फी बदल करू देणार नाही, असेही सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनी स्पष्ट केले होते. तरीही आपले शूर जवान देशाच्या सीमांचे रक्षण करीत असताना अनावश्यक वाद निर्माण करून त्यांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे निवेदनात म्हटले आहे. सर्वपक्षीय बैठकीत राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात सरकारला आणि लष्कराला विनाशर्त पाठिंबा देण्यात आला. अपप्रचार करून देशवासीयांच्या एकात्मतेच्याभावनेला कोणीही धक्का लावू शकत नाही, असा केंद्र सरकारला विश्वास वाटतो, असेही निवेदनात स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाचे निवेदन म्हणते..

जवानांच्या शौर्यामुळेच प्रत्यक्ष ताबा रेषेच्या भारताच्या भूभागात चिनी सैनिक घुसखोरी करू शकले नाही. १६ बिहार रेजिमेंटच्या जवानांनी प्राणांचे बलिदान देऊ न चिनी सैनिकांचा बांधकाम करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. त्या दिवशी प्रत्यक्ष ताबा रेषेचे उल्लंघन करणाऱ्या चिनी सैनिकांना जवानांनी रोखले. ज्यांनी उल्लंघन करून आपल्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला त्यांना आपल्या शूर भूमिपुत्रांनी धडा शिकवला, असे पंतप्रधान म्हणाले होते. भारतीय लष्कराच्या शौर्याचा पंतप्रधानांनी गौरव केला होता. देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी भारतीय लष्कर कोणत्याही टोकाला जाऊन तोडीसतोड प्रत्युत्तर देईल, असेही पंतप्रधान सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले होते, असे या निवेदनात स्पष्ट केले आहे.

मोदींनी चीनला निर्दोष ठरवले का- काँग्रेस</strong>

गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतरही काँग्रेसने केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. भारताच्या हद्दीत कोणीही घुसखोरी केली नाही, असे जाहीर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला निर्दोष ठरवले आहे का, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. त्या आधी काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधानांच्या शुक्रवारच्या सर्वपक्षीय बैठकीतील विधानांवर अनेक प्रश्न उपस्थित केले.

‘गलवान’वरील चीनचा दावा भारताने फेटाळला

लडाखमधील गलवान खोऱ्यावर चीनने केलेला दावा भारताने शुक्रवारी फेटाळून लावला. गलवान खोऱ्याला आपल्या सार्वभौमत्वाशी जोडणाऱ्या चीनला भारताने खडे बोल सुनावले आणि चीनच्या दाव्याचे खंडन केले. परराष्ट्र व्यवहार खात्याचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले, ‘प्रत्यक्ष ताबा रेषेसंदर्भात चीनने अतिशयोक्तीपूर्ण आणि तकलादू दावे केले आहेत. ते स्वीकारार्ह नाहीत. गलवान खोऱ्याची स्थिती ऐतिहासिकदृष्टय़ा स्पष्ट आहे. चीनने केलेला दावा त्याच्या आधीच्या भूमिकेशी फारकत घेणारा आहे. त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत मान्य करता येणार नाही.’ गलवान खोरे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चीनकडील बाजूस असल्याचा दावा शुक्रवारी चीनने केला होता. गलवान खोऱ्याचा हा भाग चीनच्या अधिकृत नकाशातही समाविष्ट नाही. तो प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारताकडील बाजूस असूनही चीन १९६२ पासून त्यावर दावा करीत आहे.