आपल्या नऊ वर्षांच्या राजवटीत केलेल्या चुकांबद्दल पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी दयेची याचना केली आहे. आपल्याविरुद्धच्या सर्व खटल्यांना सामोरे जाण्याची आपली तयारी असून डरपोकपणे आपण देश सोडून जाणार नाही, असेही मुशर्रफ यांनी म्हटले आहे.
आपण जे काही निर्णय घेतले ते देशहितासाठीच घेतले. ते निर्णय कदाचित चुकीचेही असतील, मात्र त्यामागे आपला चुकीचा हेतू नव्हता. तरीही आपल्याकडून चुका झाल्याचे कोणाला वाटत असेल तर आपल्यावर दया करावी, असे मुशर्रफ यांनी ‘एआरवाय न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
देशद्रोहासह मुशर्रफ यांच्याविरुद्ध अनेक खटले प्रलंबित आहेत. मात्र आपण देश सोडून जाणार नाही, असेही ते म्हणाले. डरपोकपणे आपण पळून जाणार नाही आणि सर्व आरोपांमधून निर्दोष बाहेर पडण्यासाठी खटल्यांना सामोरे जाऊ, असेही त्यांनी म्हटले आहे. आपल्याविरुद्ध १०० खटले असले तरी बेहत्तर, असेही ते म्हणाले.
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुत्तो यांच्या हत्येसह अन्य प्रकरणात मुशर्रफ यांना जामीन मंजूर करण्यात आला असून त्यांच्यावर २००७ मध्ये देशात आणीबाणी लादल्याबद्दल विशेष न्यायालयात देशद्रोहाचा खटला सुरू आहे.
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन आणि दहशतवादाचा मुकाबला करणे या दोन प्रमुख समस्या सध्या देशाला भेडसावत असल्याचे ते म्हणाले.