पेशावरमधील शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार करत १५० चिमुरड्या मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चार दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये बुधवारी सकाळी फासावर लटकविण्यात आले. कोहातमधील कारागृहात या चारही जणांना फासावर लटकविल्याची माहिती कारागृह अधीक्षकांनी वृत्तसंस्थांना दिली. दहशतवादी हल्ला घडवून अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांना फासावर लटकविण्याची पाकिस्तानमधील ही पहिलीच घटना आहे.
मौलवी अब्दुस सलाम, हजरत अली, मुजीबूर रहमान, साबिल ऊर्फ याह्या अशी या चौघांची नावे असल्याचे कोहातमधील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या चौघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर पाकिस्तानमधील लष्कराकडून त्यांच्याविरुद्ध डेथ वॉरंट जारी करण्यात आले. त्यानुसारच सर्वांना फाशी देण्यात आली. चारही दहशतवाद्यांना मंगळवारी रात्री त्यांच्या कुटुंबीयांना भेटू देण्यात आले होते. त्यांच्या इच्छेनुसारच ही भेट घडवून आणण्यात आली होती.
गेल्यावर्षी १६ डिसेंबरला पेशावरमधील शाळेत घुसून या चौघांसह इतर दहशतवाद्यांनी शाळेतील मुलांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. अंगाचा थरकाप उडविणाऱ्या या घटनेमध्ये १५० निरपराध चिमुरड्यांचा जीव गेला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मुलांचे मृतदेह बघून अनेक पालकांनी आक्रोश केला होता.