राजधानी एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस यांसारख्या ‘प्रीमियम’ दर्जाच्या गाडय़ांना प्राधान्य देण्यासाठी सामान्य पॅसेंजर गाडय़ांचा खोळंबा करू न देण्यासंबंधी रेल्वेला आदेश देण्यासंबंधीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. प्रत्येक प्रवाशाला आपल्या इच्छित स्थळी वेळेत पोहोचण्याचा अधिकार असल्यामुळे ‘राजधानी’सारख्या गाडय़ांचा मार्ग मोकळा करण्यासाठी इतर गाडय़ा थांबवू नयेत, अशी विनंती करणारी याचिका न्यायालयासमोर दाखल करण्यात आली होती. सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी फेटाळून लावली.
एकीकडे एक्स्प्रेस गाडय़ांची मागणी होत असताना त्या गाडय़ांना प्राधान्य देऊ नये अशी मागणी तुम्ही करीत आहात, अशी टिप्पणी खंडपीठाने केली. सर्वच गाडय़ा ‘सुपर-फास्ट’ दर्जाच्या कराव्यात, अशी मागणी तुम्ही करायला हवी होती, असेही मत खंडपीठाने मांडले.