कुख्यात गुंड विकास दुबे याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने चकमकीत ठार केलं आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालायत विकास दुबेला पोलीस चकमकीत ठार करतील अशी शक्यता व्यक्त करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात विकास दुबेला सुरक्षा दिली जावी अशी मागणीही केली होती. पण ही याचिका सुनाणीसाठी येण्याआधीच विकास दुबे ठार झाला आहे. लाइव लॉने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

याचिकेत सांगण्यात आलं होतं की, “विकास दुबेच्या साथीदारांची खोट्या चकमकीत हत्या करण्यात आली आहे”. घनश्याम उपाध्याय या वकिलाने ही याचिका केली होती. याचिकाकर्त्या वकिलाने गेल्या काही दिवसात उत्तर प्रदेशात झालेल्या चकमकींची माहितीही याचिकेत दिली आहे. वकिलाने विकास दुबेचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावं अशी मागणीही केली होती.

याचिकेत सांगण्यात आलं आहे की, “विकास दुबेला सुरक्षा पुरवली जावी आणि चकमकीत त्याला ठार करणार नाहीत यासाठी योग्य ती उपाययोजना करत काळजी घेण्याचे आदेश उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकारला द्यावेत. न्यायालयात दिलेल्या तारखेला त्याला हजर करण्यासाठीही सुरक्षा पुरवली जावी”. याचिकाकर्त्या वकिलाने विकास दुबेचं घर पाडल्याबद्दल तसंच साथीदारांची हत्या केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्याची मागणीही केली होती.

पण ही याचिका सुनावणीसाठी न्यायालयासमोर येण्याआधीच विकास दुबे चकमकीत ठार झाला आहे.. उत्तर प्रदेश पोलिसांचं विशेष पथक विकास दुबेला घेऊन कानपूरला येत असताना नाट्यमय घडामोडींनंतर त्याला ठार करण्यात आलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चाललं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे याने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केलं.