देशात शुक्रवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत. त्यामुळे आता पेट्रोल प्रति लिटरमागे २.२५ रूपयांनी तर डिझेल प्रति लिटरमागे ०.४२ पैशांनी स्वस्त होणार आहे. गेल्याच महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दर कमी करण्यात आले होते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे पेट्रोल आणि डिझेलचे हे सुधारित दर जाहीर करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरांत झालेली घसरण आणि रुपया व डॉलरच्या विनिमय दरांतील बदल यामुळे देशांतर्गत इंधनाच्या दरांत बदल केले जातात. दर महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपन्या आपल्या इंधन दरांत बदल करत असतात. गेल्या दोन महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत ससत वाढ होत होती. या पंधरवडय़ात मात्र त्याला छेद दिला जाऊन दर कमी केले जात आहेत.