आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमती घसरल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात आज कपात झाली आहे. पेट्रोल १८ पैशांनी तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त झाले आहे. मुंबईत पेट्रोलचा आजचा दर ८२.६२ रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर ७५.३६ रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली आला आहे.


दररोज होणाऱ्या इंधन दर बदलानुसार, आज सलग आठवडाभर पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये घट झाली आहे. त्याचा थेट फायदा नागरिकांना होत असून दरवाढीची झळ कमी झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

दरम्यान, राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ७७.१० रुपये प्रतिलिटर इतका आहे तर मुंबईत हाच दर ८२.६२ रुपये प्रतिलिटर आहे. या दोन्ही दरांमध्ये सुमारे पाच रुपयांचा फरक असून दिल्लीतील सरकारने इंधनावरील कर कमी केल्याने राज्याच्या तुलनेत त्यांच्याकडे या किंमती कमी आहेत. त्याचप्रमाणे दिल्लीत डिझेलचा दर ७१.८९३ रुपये प्रतिलिटर आहे. तर मुंबईत डिझेलचा दर ७५.३६ रुपये प्रतिलिटर आहे.