पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २३ पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ३१ पैशांनी वाढ झाली आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८७ रूपये ७३ पैसे तर डिझेलची किंमत प्रति लिटर ७७ रुपये ६८ पैसे झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर २३ पैशांनी तर डिझेल प्रति लिटर २९ पैशांनी महागले आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर ८२.२६ तर डिझेल प्रति लिटर ७४.११ रूपये झाले आहे.

 

मुंबईसह पालघर, डहाणू, तलासरीमध्ये पेट्रोलचा दर ८७ ते ८८ रुपये आहे, मात्र शेजारच्या गुजरात राज्यात पेट्रोलचा दर ८० रुपये असल्याने सीमाभागातील अनेक वाहनचालक इंधन भरण्यासाठी गुजरातकडे जात असल्याचे चित्र आहे. गुजरातकडे जाणारा वाहनचालकही महाराष्ट्रात पेट्रोल भरण्यापेक्षा गुजरामध्ये पेट्रोल भरणे अधिक पसंद करत आहे. गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील डिजेल दर स्वस्त असल्याने डिजेलवर चालणाऱ्या वाहनांचे चालक मात्र महाराष्ट्रात डिजेल भरत आहेत.

महाराष्ट्राच्या सीमेलगत असणाऱ्या चारोटी येथे डिझेलचा दर ७६.४४ रुपये आहे, तर गुजरातमध्ये वापी येथे डिझेलचा दर ७८.०६ प्रतिलिटर आहे. डिझेलचे दर राज्यात कमी असल्याने अवजड वाहेन तसेच डिझेलवर चालणारी वाहने वसई आणि पालघर तालुक्यात इंधन भरताना दिसून येत आहेत. महाराष्ट्रात डिझेल गुजरातपेक्षा स्वस्त मिळते म्हणून आम्ही डिझेलसाठी महाराष्ट्रातील पंपावर जातो, असे गुजरातमधून महाराष्ट्रात येणाऱ्या ट्रकचालकांनी सांगितले.